मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. या आंदोलनासाठी शेकडो मराठा बांधव मुंबईत आले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण झाली. दरम्यान आंदोलनाविरोधातील एका याचिकेवर सुनावणी करताना, ३ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यानंतर, पोलिसही अॅक्शन मोडवर आले आहेत. अशी एकंदरित परिस्थिती असतानाच, आता खासदार उदयन राजे भोसले यांची या आंदोलनासंदर्भात पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते साताऱ्यात पत्रकारांसोबत बोलत होते.
काय म्हणाले उदयनराजे?मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना उदयनराजे म्हणाले, "माझ्या पोटात असतं, तेच माझ्या ओठात असतं. मी या पूर्वीही, कधीही कुठलाही विषय असूदेत, जे योग्य असेल त्याला योग्यच म्हणत असतो. मी परिणामांना कधी घाबरत नाही, कधी घाबरलो नाही. खरे सांगतो, कोण काय म्हणेल..., पण माझी प्रकृती बरी नव्हती. मी अॅडमिट होतो म्हणून जाऊ शकलो नाही. नाही तर मला काय, यापूर्वी मी अंतरवलीला गोलोच होतो ना. मराठा आरक्षणाचा विषय असू देत, कुणावर अन्यायाचा विषय असूदेत अथवा कुठलाही विषय असूदेत, मी नेहमी धाऊन जातच असतो. निश्चितपणे शासनाने या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढावा."
उदयनराजे पुढे म्हणाले, "अधिक तपशिलात जाण्यापेक्षा, शासनाने जे आंदोनल करत आहेत, त्यांचे जे कुणी प्रमुख आहेत, त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर यातून मार्ग काढावा. मी माध्यमांच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती करणार आहे की, जे आंदोलनकर्ते आहेत, त्यांची जी टीम आहे, त्यांच्यासोबत लवकरात लवकर बसून, यातून मार्ग काढवा, ही सर्वांचीच अपेक्षा आहे."
जरांगे यांनी शासनासोबत बसून मार्ग काढावा -जरांगे यांना उद्देशून बोलताना उदयनराजे म्हणाले, "त्यांनी लवकरात लवकर शासनासोबत बसून मार्ग काढावा. त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. कारण त्यांच्यावरही त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. याच बरोबर इतर, जे उपोषणाला बसलेले लोक आहेत. त्यांचेही कुटुंब त्यांच्यावर अवलंबून आहे."