खाकीच्या पेहराव्यात वावरली, पण कधीच नाही ‘ती’ बावरली; आत्महत्येनंतर अनेक किस्से समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 18:57 IST2023-06-28T18:14:43+5:302023-06-28T18:57:32+5:30
पोलिसांची वर्दी घालून ती इन्स्टाग्राम वर व्हिडीओ, फोटो अपलोड करत होती

खाकीच्या पेहराव्यात वावरली, पण कधीच नाही ‘ती’ बावरली; आत्महत्येनंतर अनेक किस्से समोर
विकास शिंदे
मलटण : चौधरवाडी, ता फलटण येथील आत्महत्या केलेल्या ऋतुजा सुशांत रासकर (वय २२) हिच्या मृत्यू नंतर अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. तिने टोकाचा निर्णय घेण्यापाठीमागे नक्की कारण काय, हे मात्र, उघड झालं नसलं तरी तब्बल दोन वर्षे ती मुबंई पोलिस म्हणून खाकीच्या पेहराव्यात वावरत होती. मात्र, कधीच ती बावरली नाही. इतक्या सराईतपणे ती अंगावर खाकी वर्दी घालून सार्वजनिक ठिकाणी फिरत होती.
ऋतूजाने प्रेम विवाह केल्यानंतर आपला दरारा सासरच्या लोकांच्यावर असावा किंवा प्रेमविवाहाचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून ती पोलिस म्हणून वावरत होती, अशीही एक बाजू समोर येतेय. परंतू या पुढे जाऊन काही गोष्टी कायद्याच्या दृष्टीने व पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ती इतके दिवस पोलिस असल्याचे नुसते सांगत नव्हती तर पोलिसांची वर्दी घालून ती इन्स्टाग्राम वर व्हिडीओ, फोटो अपलोड करत होती. हे व्हिडीओ फोटो कुणीच पाहिले नाहीत असेही नाही. तिच्या व्हिडीओ व फोटोला बघणारे लाखोंच्या घरात आहेत मग पोलिसांना कधी हे दिसलं नाही का, असाही प्रश्न उपस्थित होतोय.
एक तरुण मुलगी पोलिस नसताना पोलिस मुख्यालयात जाते तिथे फोटो काढते. पोलिसांच्या दुचाकी ,व्हॅन यासमोर फोटो काढते एवढेच नव्हे तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वारीमध्ये पाणी व खाऊ वाटप करते. त्याचे इन्स्टाग्राम वर व्हिडीओ टाकते. या गोष्टी पोलिसांना कधी दिसल्या नाहीत किंवा तिच्या जवळच्या कुणाला कधी शंका आली नाही.
तिच्याकडे वर्दी , पोलिसांचे ओळखपत्र ,बॅच या गोष्टी आल्या कुठून. एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ती ही वर्दी या सर्व गोष्टी पाडव्याच्या पूजेत पूजन करताना दिसते. यावरून वर्दी बद्दल तिला किती प्रेम होतं हे कळतं. पोलिस होण्याची तिची महत्वकांक्षा खूप मोठी होती. ती पोलिस नसताना पोलिस म्हणून जगत होती. वर्दी आणि पोलिस खाते याबद्दल ती आपल्या पोस्टमधून सतत बोलत होती. असे असले तरी तिच्या जवळच्या कुणीतरी तिचे समुपदेशन करायला हवे होते, अशी मनातील सल अनेकांनी बोलून दाखवली.
या दोन्ही कारणांचा शोध हवा...
गेल्यावर्षी तिने सायबर क्राईम मुंबईमध्ये नोकरीला लागल्याबद्दल पेढेही वाटले होते. तिने आत्महत्या करेपर्यंत ती मुंबई पोलिस कर्मचारी नाही, हे कुणालाच माहिती नव्हते. तिच्या आत्महत्येच्या कारणाइतकेच ती पोलिस बनून का वावरत होती, त्याचा फलटण पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे.