सातारा : बेकायदा स्टेराॅइड इंजेक्शनची विक्री करणाऱ्या राष्ट्रीय मल्लाला अटक केल्यानंतर यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले. सातारा शहर पोलिसांनी मंगळवारी मुंबईतून मुख्य सूत्रधाराला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. तय्यब हाफीस खान (वय २३, रा. मालाड, मुंबई) असे पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे.सातारा शहर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय मल्ल शिवराज कणसे (वय २५, रा. शाहूनगर, सातारा) याला अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर पोलिसांना स्टेराॅइड इंजेक्शन विक्री करणाऱ्यांची नावे समोर आली. यानंतर पोलिसांनी एका शिकाऊ डाॅक्टरसह तिघांना अटक केली. या तिघांच्या चाैकशीतून मुख्य आरोपीचे नाव पोलिसांनी निष्पन्न केले. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोमवारी मुंबईला रवाना झाले होते. पोलिसांनी मालाड येथून तय्यब खान याला अटक करून साताऱ्यात आणले. रात्री उशिरा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तय्यब खान हा स्टेराॅइड इंजेक्शनची विक्री साताऱ्यातील खेळाडूंना करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. स्टेराॅइड इंजेक्शनची व्याप्ती वाढत असल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
‘स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:16 IST