माहुली रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:33 AM2021-01-15T04:33:20+5:302021-01-15T04:33:20+5:30

सातारा : सातारा शहरातून क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी ...

Mahuli road is rocky | माहुली रस्ता खड्डेमय

माहुली रस्ता खड्डेमय

Next

सातारा : सातारा शहरातून क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी रस्त्याची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या पुढील काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. रात्रीच्यावेळी तर वाहने या खड्ड्यात आदळत असतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संबंधितांनी डांबराने खड्डे मुजवावेत, अशी मागणी होत आहे.

वृक्षारोपणाची मागणी

सातारा : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करणयात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे. सातारा-पंढरपूर मार्ग जिल्ह्यातील कोरेगाव, पुसेगाव, निढळ, गोंदवले, म्हसवडवरून जातो. या मार्गाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात झाडे होती. पण, महामार्गाच्या कामावेळी अनेक झाडे पाडण्यात आली. त्यामुळे सध्या रस्त्याच्या बाजुला अपवादात्मकच झाडे दिसतात. पर्यावरण संतुलनासाठी या महामार्गाच्या बाजुला वृक्षारोपण करुन संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.

खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान

सातारा : सातारा-कास रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. सातारा शहराजवळील यवतेश्वर घाटातून कास मार्ग जातो. या मार्गावर घाटातही जागोजागी खड्डे पडलेले आहेत. तसेच साईडपट्टीही खचली आहे, तर कासकडे जातानाही अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. चऱ्या पडल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत जावे लागते. रात्रीच्या सुमारास तर नवीन वाहनधारकांना रस्ता व खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने आदळतात. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. समर्थ मंदिरापासून धस कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रात्रीच्यासुमारास भटकी कुत्री बसलेली असतात. अनेकवेळा ही कुत्री दुचाकीधारकांच्या अंगावर धावून जातात. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

पार्किंगमध्ये अस्ताव्यस्त वाहने

सातारा : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात येत आहेत. त्यामुळे गाड्या काढताना व उभ्या करताना अडचणी निर्माण होत आहेत. याप्रकरणी संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेसमोर दुचाकीसाठी पार्किंग आहे. या ठिकाणी नोकरदार दुचाक्या लावतात. तसेच कामानिमित्त येणाऱ्यांच्या गाड्या असतात. पण, अनेकवेळा पार्किंगमध्ये जागा उरत नाही. त्यावेळी नागरिक कशाही पध्दतीने दुचाक्या उभ्या करतात. त्यामुळे इतरांना गाडी बाहेर काढता येत नाही.

अपघाताची भीती निर्माण

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील शिरताव ते वरकुटे मलवडी या रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. सुमारे नऊ किलोमीटरच्या या अंतरात अनेक ठिकाणी रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. त्यातच रस्ता अरुंद असल्याने समोरासमोर वाहन आल्यास खाली घ्यावे लागते. अशावेळी वाहन घसरत आहे. अनेकवेळा दुचाकीस्वार पडण्याचीही घटना घडली आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

साताऱ्यातील रस्त्यावर स्टंटबाजी

सातारा : शहरातील राजपथावर रात्रीच्यासुमारास युवकांकडून दुचाकीवर बसून स्टंटबाजी सुरू असते. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. राजपथावर रात्री नऊनंतर काही युवक दुचाक्या बेफामपणे चालवत येत असतात. तसेच हॉर्नचाही कर्णकर्कश आवाज करतात. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या हुल्लडबाज युवकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच रात्री साडेदहापर्यंत दोन ठिकाणी तरी पोलिसांची नियुक्ती करावी, म्हणजे संबंधितांवर कारवाई करता येईल, अशी मागणी होत आहे.

नागरिकांकडून अस्वच्छता

सातारा : सातारा शहरातील शेटे चौकामधील स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री कचरा विस्कटतात. कधी कधी हा कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे संबंधितांनी येथील स्वच्छता वारंवार करण्याची गरज आहे.

बाजारपेठेत गर्दी वाढली

सातारा : कोरोनानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंसह किराणा मालाच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. दुकानदारांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात असले, तरी काही दुकानांत याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असून, रात्री ९ वाजेपर्यंत किराणा दुकाने सुरू असतात. त्यामुळे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे.

रस्त्यालगत स्वच्छता

कऱ्हाड : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर नाका ते ढेबेवाडी फाट्यादरम्यानच्या रस्त्याकडेला उगवलेले गवत मशीनच्या साह्याने कापण्याचे काम सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून हे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना धुळीचा होणारा त्रास कमी झाला आहे.

दुरुस्तीची मागणी

सातारा : सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातील वाहतूक सध्या धोकादायक ठरू लागली आहे. या घाटातील ठिकठिकाणच्या संरक्षक कठड्यांची पडझड झाली असून, काही ठिकाणी संरक्षक कठडे केवळ नावालाच उरले आहेत. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी वाहनधारकांना अनेक अडचणी येत आहे.

डांबरीकरणाची मागणी

सातारा : अर्कशाळा, शाहूपुरीकडे जाणाऱ्या कोटेश्वर मंदिराजवळ पालिकेच्यावतीने नवीन पुलाची उभारणी करण्यात आली आहे. येथील रस्त्याचे रुंदीकरणही करण्यात आले आहे. परंतु डांबरीकरणाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने वाहनधारकांची परवड सुरूच आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेच्यावतीने या पुलावरील रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे व वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Mahuli road is rocky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.