माहुलीमध्ये सामूहिक चिखलस्नान उत्साहात : सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:42 IST2018-11-12T22:39:30+5:302018-11-12T22:42:14+5:30
सातारा : देशभरात ११ ते १८ नोव्हेंबर कालावधीत निसर्गोपचारांचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्वत्र ...

साताºयातील क्षेत्र माहुलीमध्ये चिखलस्नान उपक्रमात शेकडो लोकांनी सहभाग घेतला होता.
सातारा : देशभरात ११ ते १८ नोव्हेंबर कालावधीत निसर्गोपचारांचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्वत्र सामूहिक माती स्नान करण्यात आले. सकाळी दहा वाजता क्षेत्र माहुली येथे कृष्णा नदीच्या तीरावर साताऱ्याच्या ओंकार निसर्गोपचार केंद्राच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती आयएनओचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र भारती-झुटिंग यांनी दिली.
आयएनओ पश्चिम महाराष्ट्रच्या समन्वयक डॉ. पल्लवी दळवी, जिल्हा परिषदेचे श्रीकांत ताडे, डॉ. स्वाती राजे, राजेंद्र नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.यावेळी निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. स्वाती राजे यांनी माती स्नानाचे महत्त्व सांगितले. विशिष्ट पद्धतीने माती तयार करून माती स्नानासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
सर्व सहभागींनी माती स्नानाचा आनंद घेतला. माती स्नानानंतर अर्धा तास सूर्यस्नान झाले. त्यानंतर नदीत जलस्नान करण्यात आले. देशात सर्वच राज्यांत एकाच वेळी हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाचे लाईव्ह व्हिडीओ शूटिंग केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय व एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डला पाठविण्यात आले आहे. सर्व सहभागी व्यक्तींना वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळणार आहे. जिल्ह्यात प्रथमच झालेल्या वर्ल्ड रेकॉर्ड माती स्नानाचे सर्वांनी कौतुक केले. १०० पेक्षा जास्त लोक या उपक्रमात सहभागी झाले. यशोदा निसर्गोपचार केंद्र येथे अनिल महामुनी यांनीही हा उपक्रम राबवला.