महाराष्ट्र हादरला: हातावर लिहिली नोट, महिला डॉक्टरने जीवन संपवले; समोर आली धक्कादायक कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:24 IST2025-10-25T09:24:02+5:302025-10-25T09:24:20+5:30
माझ्या मरण्याचे कारण पो. उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, त्याने चार वेळा अत्याचार केला, बनकरने ४ महिने शारीरिक व मानसिक छळ केला

महाराष्ट्र हादरला: हातावर लिहिली नोट, महिला डॉक्टरने जीवन संपवले; समोर आली धक्कादायक कारणे
लोकमत न्यूज नेटवर्क, फलटण (जि. सातारा) : सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने स्वत:च्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे.
याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले असून, दोघांचा शोध घेतला जात आहे.
संबंधित महिला डॉक्टर फलटणमधील एका हॉटेलमध्ये राहत असलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावूनही तो उघडला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर महिलेने गळफास घेतल्याचे आढळून आले. फलटण शहर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
गळफास घेण्यापूर्वी तळहातावर लिहिले आत्महत्येचे कारण
हातावरील मजकूरच पुरावा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आणि सखोल तपास केला जाईल, असे सांगितले आहे. हातावरील मजकूर हा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
चौकशीचे आदेश
घटनेची माहिती मिळताच, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी संपर्क साधून त्यांना स्वतः घटनास्थळी भेट देण्याचे आणि सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गोपाळ बदने निलंबित
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली असून, संबंधित जबाबदार असलेल्या पोलिसांना तत्काळ निलंबित करावे, असे आदेश पोलिसांना दिले. त्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला तत्काळ निलंबित केले आहे.
शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव
शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. जर असा त्रास झाला, तर मी आत्महत्या करेन, असेही ती घरच्यांना सांगत होती. याबाबत त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. याची चौकशी सुरू होती. त्याआधीच त्यांनी मानसिक व शारीरिक छळास कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप संबंधित डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केला.