साताऱ्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डमी विद्यार्थी, दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:29 IST2018-03-23T12:16:39+5:302018-03-23T12:29:16+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहायक पदाच्या परीक्षेत साताऱ्यात दोन वर्षांपूर्वी डमी विद्यार्थी बसवून नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद बळीराम चेंबोले (रा. धाणोरा, जि. नांदेड) व नरसाप्पा शिवहार बिराजदार (रा खिल्लारी, ता. औसा, जि. लातूर) अशी आरोपींची नावे आहेत.

साताऱ्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डमी विद्यार्थी, दोघांवर गुन्हा दाखल
सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहायक पदाच्या परीक्षेत साताऱ्यात दोन वर्षांपूर्वी डमी विद्यार्थी बसवून नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद बळीराम चेंबोले (रा. धाणोरा, जि. नांदेड) व नरसाप्पा शिवहार बिराजदार (रा खिल्लारी, ता. औसा, जि. लातूर) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, एमपीएससीचे उपसचिव एस. एच. अवताडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहायक पदासाठी २८ जून २०१६ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेत गोविंद चेंबोले याने परीक्षेसाठी नांदेड येथील जिल्हा केंद्र उपलब्ध असताना गैरप्रकार करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक सातारा जिल्हा केंद्राची निवड केली. त्याने स्वत:च्या नावावर सातारा जिल्हा केंद्रावरील एसटी ००१४५८ या बैठक क्रमांकावर नरसाप्पा बिराजदार याच्या मध्यस्थीने डमी विद्यार्थी बसवला.
सातारा येथील अण्णासाहेब कल्याणी हायस्कूलमध्ये कर सहायक पदाची परीक्षा देत उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवली. अशाप्रकारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पोरे करीत आहेत.