Maharashtra Election 2019 : किल्लेदार फोडले बालेकिल्ला घेण्याचा मनसुबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 04:05 AM2019-10-12T04:05:58+5:302019-10-12T04:10:02+5:30

जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा धडाका लावला.

Maharashtra Election 2019: satara district leaders fight to vidhan sabha election | Maharashtra Election 2019 : किल्लेदार फोडले बालेकिल्ला घेण्याचा मनसुबा

Maharashtra Election 2019 : किल्लेदार फोडले बालेकिल्ला घेण्याचा मनसुबा

Next

- दीपक शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा सातारा जिल्हा भाजपच्या नेत्यांनी सतत तोफगोळे टाकून खिळखिळा केला. किल्ला ताब्यात येत नाही म्हटल्यावर किल्लेदारांनाच आपल्या बाजूला घेत बालेकिल्लाच ताब्यात घेण्याचा मनसुबा आखला आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात, दोन काँग्रेसकडे आणि एक शिवसेनेकडे अशी स्थिती आहे. यावेळी निवडणुकीत पाच मतदारसंघात दुरंगी तर तीन मतदारसंघांत तिरंगी लढत होत आहे.
जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा धडाका लावला. भाजपने त्यांना सामावून घेतले आणि जुन्यांना थांबवत नव्याने प्रवेश दिलेल्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले काहीजण भाजपमधूनही बाहेर पडले. ज्यांना उमेदवारी देतो म्हणून आश्वासन दिले, त्यांना ऐनवेळी मित्रपक्षाची उमेदवारी दिली तर काहींना चक्क थांबविले. त्यामुळे बंडखोरी झाली.
साताऱ्यात भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीकडून दीपक पवार यांच्यातील पारंपरिक लढत तशीच होतेय. फक्त त्यांच्या पक्षाची अदलाबदल झाली आहे. पाटणमध्ये शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पार पडेल. वाईमध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले मदन भोसले यांच्यात जोरदार लढत होईल, तशीच स्थिती कोरेगावमध्येही पाहायला मिळेल. याठिकाणी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि भाजपमधून शिवसेनेमध्ये आलेले महेश शिंदे यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) आघाडी सरकारच्या काळात कामेच झाली नाहीत.
२) दुष्काळी भागात पाणी नेणे, आरोग्य महाविद्यालय, हद्दवाढ, उद्योग आणि बेरोजगारी हटविणे
३) अपूर्ण सिंचन योजना, कालव्यांची कामे पूर्ण करणे, रखडलेले सहापदरीकरण

रंगतदार लढती
माणमध्ये शेखर गोरे आणि जयकुमार गोरे हे सख्खे भाऊ एकमेकांविरोधात लढत आहेत. दोघांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावून सेना आणि भाजपची उमेदवारी मिळविली आहे. याठिकाणी गोरे बंधूंसमोर सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी विकासाच्या मुद्द्यावर आव्हान उभे केले आहे.
फलटणमध्ये रामराजे नाईक-निंबाळकर समर्थक राष्टÑवादीचे दीपक चव्हाण आणि रिपाइंने दिलेली दीपक निकाळजे यांची उमेदवारी रद्द करून भाजपने दिलेले दिगंबर आगवणे यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे.
कºहाड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्यात चांगली लढत होईल. तर अपक्ष उदयसिंह उंडाळकर किती मते घेणार? यावर पृथ्वीराज चव्हाण विजयी होणार की अतुल भोसले , हे अवलंबून असेल. कºहाड दक्षिणमध्ये सर्वाधिक विकास कोणी केला? हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: satara district leaders fight to vidhan sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.