Satara: महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक पुढे ढकल्याने प्रचाराचा उत्साह ओसरला, नव्या रणनीतीत उमेदवार व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:17 IST2025-12-04T19:16:28+5:302025-12-04T19:17:22+5:30

Local Body Election: समाज माध्यमावर प्रचाराची धुरा...

Mahabaleshwar Municipality election postponement dampens campaign enthusiasm, candidates busy with new strategy | Satara: महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक पुढे ढकल्याने प्रचाराचा उत्साह ओसरला, नव्या रणनीतीत उमेदवार व्यस्त

Satara: महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक पुढे ढकल्याने प्रचाराचा उत्साह ओसरला, नव्या रणनीतीत उमेदवार व्यस्त

महाबळेश्वर : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २ डिसेंबर) मतदान होणार होते. न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली गेली आहे. मतदानाची तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली असून, आता मतदान दि. २० डिसेंबर रोजी आणि मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या बदलाचा शहरातील राजकीय वातावरण, व्यापारी हालचाली आणि मतदारांवर परिणाम दिसून येत आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून शहरात निवडणुकीचा माहोल आपसूकच तापला होता. उमेदवारांच्या रॅली, सभा, घरोघरी जाऊन केलेला जनसंपर्क, तरुणांना आकर्षित करण्यासाठी आखलेली विशेष कार्यक्रम योजना असे सर्व मिळून महाबळेश्वर जणू उत्सवमय झाले होते. काही उमेदवारांनी तर युवा मतदारांसाठी पार्टी व खास मेळाव्यांचे आयोजनही आखले होते. परंतु, मतदान पुढे गेल्याची घोषणा होताच ही सर्व नियोजने तत्काळ स्थगित करण्यात आली.

या निर्णयाचा सर्वाधिक दुष्परिणाम शहरातील व्यवसायांवर झाला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शहरात पर्यटक व मतदारांचा लोंढा येईल, अशी येथील हॉटेल, ढाबे, लॉजेस यांना अपेक्षा होती. मुंबई, पुणे, सातारा आणि इतर जिल्ह्यांतून मतदार मतदानासाठी महाबळेश्वरात आले देखील. तथापि, तारीख पुढे गेल्याची बातमी कळताच अनेकांनी नाराजी व्यक्त करून परतण्याचा मार्ग धरला. परिणामी, पर्यटकांनी आणि कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेली हॉटेल्स एका दिवसातच ओस पडली. स्थानिक व्यावसायिकांच्या मते, ‘निवडणूक काळ हा आमच्यासाठी छोट्या पर्यटन हंगामासारखा असतो; मात्र तारीख पुढे गेल्यामुळे बुकिंग रद्द झाली आणि व्यवसायाला मोठा फटका बसला.’

दरम्यान, सततच्या धावपळीत थकलेले काही उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक पुढे गेल्यानंतरचा काळ थोडी विश्रांती घेण्यासाठी कोकणात किंवा आसपासच्या भागात घालवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. तथापि, दुसऱ्या बाजूला उमेदवारांना या नव्या परिस्थितीमध्ये सुवर्णसंधी दिसू लागली आहे. मतदान २० तारखेला गेल्याने मिळालेल्या अतिरिक्त काळाचा उपयोग आता ते रणनीती मजबूत करण्यासाठी करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

समाज माध्यमावर प्रचाराची धुरा...

काही उमेदवारांनी सोशल मीडिया मोहीमही नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूणच, निवडणूक पुढे गेल्याने शहरातील राजकीय वातावरण शांत झाले असले, तरी या अतिरिक्त कालावधीने उमेदवारांना रणनीती बदलण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे हॉटेल व पर्यटन व्यवसायावर मात्र याचा नकारात्मक परिणाम दिसत असून, आगामी काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : महाबलेश्वर चुनाव स्थगित: प्रचार धीमा, उम्मीदवार नई रणनीति में व्यस्त

Web Summary : महाबलेश्वर नगरपालिका चुनाव स्थगित होने से प्रचार ठंडा पड़ा, व्यवसायों पर असर। उम्मीदवार अब सोशल मीडिया पर ध्यान केंद्रित कर रणनीति बदल रहे हैं। पर्यटकों के चले जाने से होटलों में बुकिंग रद्द, चुनाव की तारीख का इंतजार।

Web Title : Mahabaleshwar Election Postponed: Campaigning Slows, Candidates Strategize Anew

Web Summary : Mahabaleshwar's municipal election postponement cooled campaigning, impacting businesses reliant on voter influx. Candidates are now reworking strategies, focusing on social media. Hoteliers face cancellations as tourists departed, awaiting the revised election date.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.