लोणंद : पाडेगाव येथे व्यापारी संकुलात कंटेनर घुसला: नऊ दुकान गाळे जमीनदोस्त लाखोंचे नुकसान :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 14:47 IST2018-09-29T14:43:18+5:302018-09-29T14:47:03+5:30
निरा रस्त्यावरील पाडेगाव येथील टोल नाक्यावरील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलनाच्या गाळ्यात कंटेनर घुसला. या अपघातात नऊ दुकान गाळे जमीनदोस्त झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली.

लोणंद : पाडेगाव येथे व्यापारी संकुलात कंटेनर घुसला: नऊ दुकान गाळे जमीनदोस्त लाखोंचे नुकसान :
लोणंद : निरा रस्त्यावरील पाडेगाव येथील टोल नाक्यावरील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलनाच्या गाळ्यात कंटेनर घुसला. या अपघातात नऊ दुकान गाळे जमीनदोस्त झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. यामध्ये पन्नास लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हा अपघात शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास झाला.लोणंद -निरा रोडवर चार वर्षांपासून बंद अवस्थेत असणाºया पाडेगाव टोल नाक्यावर काही दिवसांपूर्वीच अपघात होऊन टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले होते. याच ठिकाणी छोटे -मोठे अपघात होत असताना शुक्रवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास लोणंदवरून निराकडे जाणाºया अठरा चाकी कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा कंटेनर टोल नाक्याच्या बाजूला असणाºया पाडेगाव ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळ्यांच्या दुकानात घुसला. ही धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत नऊ दुकाने अक्षरश: पत्याच्या बंगल्याप्रमाने कोलमडून पडली. या अपघातात साधारणपणे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागरिकांनी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची व अर्धवट अवस्थेत उभा असलेला टोल नाका हटविण्याची मागणी केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि गिरीष दिघावकर व त्यांचे सहकारी यांनी दोन क्रेनच्या सहायाने या कंटेनरला बाजूला केले. मुंबई येथून कंटेनर (एमएच ४६ एच ५८०७ ) पाडेगावकडे येत होता. या अपघातात चालक शिवानंद साहू (वय २२, रा. मध्यप्रदेश) हा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये कंटेनरचेही मोठे नुकसान झाले असून लोणंद पोलीस पंचनामा करीत आहेत.
दरम्यान, पुणे - पंढरपूर मार्गावर लोणंद - निरा दरम्यान निरा नदीजवळ पाडेगाव गावचे हद्दीत हा टोल नाका आहे. या टोल नाक्या शेजारीच पाडेगाव ग्रामपंचायचे व्यापारी गाळे आहेत. त्यामध्ये अनील धायगुडे, जयदीप धायगुडे, सुनील नवले, नारायण कोंडवे, मारूती धायगुडे, रघुनाथ धायगुडे, हरीभाऊ धायगुडे, अनिल माने यांचे हॉटेल, लॉन्ड्री, चिकन, केस कर्तनालय, बॅटरी, फोटो, लॉटरी, चायनीज असे छोटे मोठे व्यवसाय आहेत.