ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 08:01 IST2026-01-02T07:59:45+5:302026-01-02T08:01:17+5:30
या दिंडीने महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संत वाङ्मय आणि साहित्य यांच्या आठवणी जागवल्या...

छाया : जावेद खान
सातारा : साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी सायंकाळी साताऱ्यातून तब्बल ५६ चित्ररथ, लेझीम, झांज पथके, घोडेस्वार, अब्दागिऱ्या असा भलामोठा लवाजमा घेतलेल्या तब्बल दोन किलोमीटर लांब ग्रंथदिंडीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे शिक्षणाचा श्रीगणेशा केला, त्याच प्रतापसिंह हायस्कूलसमोरून ग्रंथदिंडीचा शुभारंभ झाल्यानंतर दिंडी संमेलनस्थळाकडे मार्गस्थ झाली. या दिंडीने महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संत वाङ्मय आणि साहित्य यांच्या आठवणी जागवल्या.
ग्रंथदिंडीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष बेबले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रतापसिंह हायस्कूलसमोरील गांधी मैदानापासून दिंडीस प्रारंभ झाला. दिंडी राजपथावरून कमानी हौद, शेटे चौक, पोलिस मुख्यालय मार्गे शिवतिर्थावरून पोलिस कवायत मैदान मार्गे संमेलनस्थळी मार्गस्थ झाली. यावेळी स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांची चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली.
दिंडीत ९ लेझिम पथके, सहा झांजपथके, १२ घोडेस्वार, ६ वासुदेव, १२ तुतारी वादक होते. त्यापुढे पालखी सोहळा राहिला. पालखीसोबत छत्र, १२ अब्दागिऱ्या, त्यामागे ५४ चित्ररथ, छात्रसैनिक मार्गक्रमण करत होते. सर्वात मागे रुग्णवाहिका आणि स्वच्छतेबाबत व्यवस्था करण्यात आली होती.
तीन हजार विद्यार्थी ग्रंथदिंडीमध्ये सहभागी
ग्रंथदिंडीमध्ये ५५ शाळांचे सुमारे तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले. पर्यावरण, साताऱ्यातील पर्यटन, संत साहित्य, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची शिक्षण चळवळ, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांनी केलेला संतपरंपरेचा प्रसार अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक ५६ चित्ररथ
सादर केले.
आज ग्रंथमहोत्सवात...
सकाळी ११ : उद्घाटन
दुपारी ३ : कविसंमेलन (मंडप क्रमांक १)
दुपारी ३ : बाल-कुमार वाचन कट्टा (संवाद बाल-कुमार वाचकांशी)
मंडप क्रमांक २
दुपारी ३ वाजता : परिचर्चा - जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे?
सायंकाळी ४:३० वाजता :
परिसंवाद - मराठी कोशवाङ्मय
आणि विस्ताराच्या दिशा
मंडप क्रमांक १ मध्ये
रात्री ८ वाजता नाटक : शिकायला गेलो एक
साहित्यिकांसाठी साताऱ्याची ओळख असणारे स्मृतिचिन्ह !
सातारा : सातारा शहरातील ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे भव्यदिव्य तसेच वर्षानुवर्षे दखल घेण्यासारखे होणार असून, यामध्ये नवनवीन बाबी ही आहेत.
त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व साहित्यिकांना सातारा शहराची ओळख असलेले पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. यामुळे हे आणखी एक संमेलनाचे वैशिष्ट ठरणार आहे.
सातारा शहरात गुरुवारपासून ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाले आहे. एकूण चार दिवस संमेलन सोहळा रंगणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास गुरुवारी उत्साहात प्रारंभ झालेला आहे. यामध्ये ग्रंथदिंडी, ज्येष्ठ साहित्यिकांच्या सन्मान अन् बहुरूपी भारूड या कार्यक्रमांनी रसिकांची मने जिंकली. संमेलनाचे अधिकृत उद्घाटन शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ लेखिका, विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, पूर्वाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व भाषा मंत्री उदय सामंत, खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील.