Satara Crime: दारू तस्कराचा दोन कोटींचा नफा पोलिसांनी उधळला!, पाच महिन्यांपासून मागावर होती टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:03 IST2025-05-02T17:02:44+5:302025-05-02T17:03:34+5:30

तपासात अनेक खुलासे

Liquor worth Rs 84 lakh seized in Satara was to be sold for Rs 2 crore in Gujarat | Satara Crime: दारू तस्कराचा दोन कोटींचा नफा पोलिसांनी उधळला!, पाच महिन्यांपासून मागावर होती टीम

Satara Crime: दारू तस्कराचा दोन कोटींचा नफा पोलिसांनी उधळला!, पाच महिन्यांपासून मागावर होती टीम

सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि उत्पादन शुल्कने संयुक्त कारवाई करून महाराष्ट्रातील सर्वात मोठी दारूची तस्करी नुकतीच उघडकीस आणली. पोलिसांच्या तपासात आता अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. गोव्यातून ८४ लाखाला आणलेली दारू गुजरातमध्ये तब्बल दोन कोटींना विकली जाणार हाेती.

गोव्यावरून बनावट दारूची तस्करी करणाऱ्या कऱ्हाडमधील जमीर पटेल आणि ट्रकचालक सचिन जाधव या दोघांना पोलिसांनी पकडलं. या कारवाईच्या पाठीमागं पोलिसांची काय मेहनत होती, ही थक्क करणारी आहे. जमीर पटेल हा तसा पोलिसांच्या यादीवरचा. त्याचा धंदा दारू तस्करीचा तर कधी चालता बोलता पोलिसांचा अन् कधी उत्पादन शुल्कचा खबऱ्या म्हणून काम करायचा. यामुळे त्याचे कारनामे सहजासहजी समोर यायचे नाहीत. परंतु त्याची कुंडली पोलिसांजवळ असल्यामुळे तो कधीही काहीही करू शकतो, हे जाणून असलेले पोलिस त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. 

अशातच विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना जमीर पटेल हा गोव्यातून दारूची मोठी तस्करी करणार आहे, अशी माहिती मिळाली. एकीकडे निवडणुकीची धामधूम तर दुसरीकडे तस्करीची टीप. हा सारा प्रकार पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या कानावर त्यांनी घातला. अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने पीआय अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, अंमलदार अतिष घाडगे, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, साबीर मुल्ला, शरद बेबले, सनी आवटे, राजू कांबळे, मुनीर मुल्ला, मनोज जाधव, प्रमोद सावंत, अविनाश चव्हाण, धीरज महाडिक, पृथ्वीराज जाधव यांचे स्वतंत्र पथक नेमले. हे पथक गेल्या पाच महिन्यांपासून जमीर पटेल याच्या मागावर होतं. या पथकाने एकही माहिती लिक होऊ दिली नाही. अत्यंत गोपनीय पद्धतीने त्याच्यावर वाॅच ठेवला. 

तो मोबाइलही बंद ठेवायचा. चार-पाच जणांची टीम कधी कऱ्हाड तर कधी कोल्हापूर या ठिकाणी जाऊन यायची. पाच महिन्यांनंतर त्याने गोव्यात जाऊन दारू कंपनीला ८४ लाखांची रोकड दिली. याची माहिती पुन्हा मिळाली. दारूने भरलेला ट्रक गुजरातला पोहोचविण्याची तयारी झाली. गोवा तसेच महाराष्ट्राच्या हद्दीतून तपासणी केंद्राला हुलकावणी देत सातारा जिल्ह्यात ट्रकने प्रवेश केला. हे समजताच अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी या टीमला कारवाईच्या सूचना दिल्या. बोरगावजवळ दबा धरून बसलेल्या या पोलिसांच्या पथकाला अखेर तो रंगेहाथ सापडला. पाच महिन्यांपासून घेतलेली मेहनत पोलिसांच्या फळाला आली.

नंबर प्लेट व चालक वेगवेगळे..

गोव्याहून निघताना तस्कराने ट्रकची नंबर प्लेट एकच ठेवली होती; पण पुढे ती बदलण्याची शक्यता होती. तसेच चालकही चार ते पाच बदलले जाणार हाेते. एका चालकाला म्हणे, २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते, असे पोलिसांनी सांगितले.

गुजरातमध्ये चाैपट दराने होणार होती विक्री..

गुजरातमध्ये ही दारू नेऊन तिप्पट, चाैपट दराने विकली जाणार होती. यातून संबंधितांना तब्बल दोन कोटींचा निव्वळ नफा मिळणार होता, असेही तपासात समोर आलंय.

Web Title: Liquor worth Rs 84 lakh seized in Satara was to be sold for Rs 2 crore in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.