मळेवाडमध्ये जेरबंद केलेला बिबट्या सातारला हलविला, वन्यप्राणी केंद्रात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:09 IST2025-07-09T13:08:29+5:302025-07-09T13:09:04+5:30
बिबट्या हिंसक बनल्याने खबरदारी

मळेवाडमध्ये जेरबंद केलेला बिबट्या सातारला हलविला, वन्यप्राणी केंद्रात उपचार
सातारा/सावंतवाडी : मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला मंगळवारी पहाटे सातारा येथे हलविण्यात आले. तेथील वन्यप्राणी उपचार केंद्रात त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. बिबट्याच्या पायात फासके अडकल्याने मागील पायाला दुखापत झाली होती. त्यावर उपचार करण्यात आले. हा बिबट्या हिंसक बनल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली होती.
मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे भरवस्तीत शिरून बिबट्याने चौघांवर हल्ला केला होता. या बिबट्याला उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, मळगाव वनपाल प्रमोद राणे, आजगाव, बांदा, मळगाव, माजगाव वन परिमंडळातील वनकर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात कैद केले होते. संपूर्ण वाढ झालेली आठ ते दहा वर्षे वयाचा हा बिबट्या आहे.
उपाशी असल्याचे अस्वस्थ
बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तो उपाशी असल्याने अस्वस्थ असल्याचे तसेच अंगावर काही जखमा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बिबट्याला सातारा येथील वन्य प्राणी उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर डॉ. निखिल बनकर यांनी उपचार करून केले. उपचारानंतर बिबट्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
जखमींना वनविभागाकडून मदत देण्यात येणार
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मळेवाड येथील चारही ग्रामस्थांना वनविभागाकडून मदत देण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून लवकरच ही मदत देण्यात येणार आहे, तसेच जखमींची प्रकृती सुधारत असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.