तरुणाला मारहाण करून दोन लाख रुपये केले लंपास, साताऱ्यात वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:43 IST2022-02-25T15:31:51+5:302022-02-25T15:43:12+5:30
चोरट्यांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तसेच नाकाबंदी करून शोध घेण्यात येत आहे

तरुणाला मारहाण करून दोन लाख रुपये केले लंपास, साताऱ्यात वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा घडली घटना
सातारा : सातारा शहरातील रहदारी असणाऱ्या पोवई नाका परिसरात भर दिवसा एका तरुणाला मारहाण करुन लुटल्याची घटना घडली. यावेळी हल्लेखोरांनी या तरुणाजवळील दोन लाखाहून अधिकची रक्कम लंपास केली. ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, आज, शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास संबंधित तरुण बँकेत पैसे भरण्यासाठी निघाला होता. याच दरम्यान काही अज्ञात तरुणांनी संबंधित तरुणाला दांडक्याने मारहाण केली. तर त्याच्याजवळील जवळपास दोन लाखाहून अधिक रक्कम लंपास केली.
मारहाणीत चार ते पाच जणांचा समावेश असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरट्यांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. तसेच नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सातारा शहरात भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक आँचल दलाल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी भेट देऊन तपासाची सूचना केली आहे.