भाजी खरेदी करताना मोबाईल हातोहात होतायत लंपास, चोरट्यांची हुशारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 14:28 IST2021-01-27T14:26:01+5:302021-01-27T14:28:23+5:30
mobile Crimenews Police Satara- मलकापूर येथील मंडईमध्ये मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला असून, नागरिक हैराण झाले आहेत. गत काही दिवसांत मंडई तसेच मुख्य मार्गावरून अनेक मोबाईल चोरीस गेले आहेत. महागड्या मोबाईलधारकांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यातही दिली आहे. मात्र, कमी किमतीचा मोबाईल चोरीस गेलेले नागरिक याबाबत कोठेही वाच्यता करीत नाहीत.

भाजी खरेदी करताना मोबाईल हातोहात होतायत लंपास, चोरट्यांची हुशारी
मलकापूर : येथील मंडईमध्ये मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला असून, नागरिक हैराण झाले आहेत. गत काही दिवसांत मंडई तसेच मुख्य मार्गावरून अनेक मोबाईल चोरीस गेले आहेत. महागड्या मोबाईलधारकांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यातही दिली आहे. मात्र, कमी किमतीचा मोबाईल चोरीस गेलेले नागरिक याबाबत कोठेही वाच्यता करीत नाहीत.
मलकापूर येथे दररोज सायंकाळी मंडई भरते. महामार्गालगत भरणाऱ्या या मंडईमध्ये आसपासच्या गावातील अनेक शेतकरी, विक्रेते तसेच व्यापारी येतात. तसेच या बाजारात आसपासच्या गावातील ग्रामस्थांचीही खरेदीसाठी मोठी गर्दी असते. चोरटे याच गर्दीचा फायदा घेऊन हातचलाखी करीत नागरिकांच्या खिशातील मोबाईल चोरत आहेत. गत महिनाभरात अनेकांचे मोबाईल चोरीला गेले. मंडईत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुद्दाम गर्दी करून नागरिकांचे लक्ष इतर ठिकाणी वळवून मोबाईल चोरले जात आहेत.
मोबाईल चोरीमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असण्याची शक्यता आहे. मंडईत होणारी गर्दी व मोबाईल चोरीचे वाढते प्रमाण याचा विचार करून पोलिसांनी याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे. शहरात मंडईबरोबरच ढेबेवाडी फाटा, मलकापूर फाटा येथे नेहमीच ग्राहकांची व नागरिकांची गर्दी असते. त्या गर्दीचा नेहमी चोरट्यांकडून फायदा घेतला जातो. या परिसरात पोलीस अधिकारी असून देखील चोरटे चोरी करत आहेत.
मलकापूर येथे पोलीस ठाणे प्रस्तावित आहे. मात्र, अद्याप त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. सध्या कºहाड शहर पोलीस ठाण्यातील तीन ते चार कर्मचारी या विभागात लक्ष ठेऊन असतात. मात्र, शहराचा आवाका पाहता त्यांचे प्रयत्नही अपुरे पडत असून या विभागात पोलिसांनी गस्त वाढविणे गरजेचे आहे. तसेच चोरीच्या वाढत्या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा अज्ञात चोरट्यांवर लक्ष ठेवून पोलिसांनी त्यांना गजाआड करावे, अशी मागणी होत आहे.