रस्त्यावर तरुणांच्या हाती कोयता, तलवार; साताऱ्यात चौघांवर गुन्हा नोंद
By नितीन काळेल | Updated: August 16, 2023 14:31 IST2023-08-16T14:30:43+5:302023-08-16T14:31:09+5:30
घटनांत वाढ; कठोर कारवाईची मागणी

रस्त्यावर तरुणांच्या हाती कोयता, तलवार; साताऱ्यात चौघांवर गुन्हा नोंद
सातारा : सातारा शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर विना परवाना तरुणांनी कोयता आणि तलवार बाळगली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, शहरात अशा घटना वाढत असल्याने पोलिसांनी सबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी हवालदार मनोज मदने यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर शहरातीलच प्रथमेश राजेंद्र गायकवाड, संकेत सुनील मांढरे आणि धीरज जयसिंग ढाणे (तिघेही रा. चिमणपुरा पेठ) तसेच आशीष विजय सणस (रा. ढोणे काॅलनी) यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे.
पोलिसांनी सांगितले की, दि. १४ आॅगस्ट रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास शहरातील राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर हा प्रकार दिसून आला. पोलिस पेट्रोलिंग करत असताना तेथे काही तरुण दिसून आले. त्यांच्या हातात कोयता आणि तलवार होती. संबंधितांनी विनापरवाना शस्त्र बाळगले होते. त्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी चाैघांवर गुन्हा नोंद केला. याप्रकरणी हवालदार घोडके हे तपास करीत आहेत.