सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील साठा ७५ टीएमसीवर गेल्यानंतर व्यवस्थापानाने सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलून ३ हजार ४०० क्यूसेक विसर्ग सुरू केला आहे. तर पायथा वीजगृहातूनही पाणी सोडले जात असल्याने धरणातून एकूण ५ हजार ५०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे कोयना नदीकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस पडत आहे. पश्चिम भागात पावसाचा जोर राहिला आहे. तसेच पश्चिमेकडील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. यामुळे ही धरणेही ७० ते ८० टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत. त्यातच पावसाळ्याचा अजून अडीच महिना बाकी आहे. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. त्यातच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १०३ मिलिमीटर पाऊस पडला.
नवजा येथे १३४ आणि महाबळेश्वरला ९२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात सुमारे १६ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७५.४८ टीएमसी झाला होता. सुमारे ७२ टक्के धरण भरले आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी ११ च्या सुमारास सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले आहेत. त्यातून ३ हजार ४०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे. तसेच वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यामधून २ हजार १०० असा एकूण ५ हजार ५०० क्यूसेक विसर्ग धरणातून नदीपात्रात होत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. तसेच पावसाचा जोर आणि धरणात आवक वाढल्यास विसर्गातही वाढ होण्याची शक्यता आहे.
यावर्षी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जूनपासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. २ हजार ३३० मिलिमीटर पाऊस पडला. तसेच मागील दीड महिन्यात नवजा येथे २ हजार २०२ आणि महाबळेश्वरला २ हजार २१८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातील साठा वेगाने वाढला. परिणामी गतवर्षीपेक्षा यंदा लवकर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पाटण तालुक्यातील कोयना धरणातून यावर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच दरवाजातून विसर्ग सुरू झाला आहे. मंगळवारी सकाळी सहा दरवाजे दीड फुटाने उचलून ३४०० क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.