कोयनेला जूनमध्ये १० वर्षांतील उच्चांकी पाऊस, नवीन विक्रमाची नोंद; पाणीसाठा ही ५० टीएमसीवर पोहोचला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 21:41 IST2025-07-04T21:41:23+5:302025-07-04T21:41:58+5:30

यावर्षीही पश्चिम भागात आतापर्यंत पावसाने दमदार बॅटिंग केलेली आहे. यामुळे पेरणी खोळंबलीय. तसेच प्रमुख धरणांत ही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. तर कोयनानगरच्या पावसानेही विक्रमाची नोंद केलेली आहे.

Koyane records highest rainfall in 10 years in June; water storage reaches 50 TMC | कोयनेला जूनमध्ये १० वर्षांतील उच्चांकी पाऊस, नवीन विक्रमाची नोंद; पाणीसाठा ही ५० टीएमसीवर पोहोचला 

कोयनेला जूनमध्ये १० वर्षांतील उच्चांकी पाऊस, नवीन विक्रमाची नोंद; पाणीसाठा ही ५० टीएमसीवर पोहोचला 


सातारा : जिल्ह्यात यावर्षी मे आणि जून महिन्यातील दमदार पाऊस झाला. यामुळे काही भागात पावसाने नवीन विक्रमही प्रस्थापित केला. तर कोयनानगर येथे जूनमध्ये १० वर्षांतील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. तब्बल १ हजार ४६४ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे जूनमध्येच धरणातील पाणीसाठाही ५० टीएमसीवर पोहोचला होता.

सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या पावसावरच वर्षभराचे शेती, औद्योगिक, सहकार तसेच बाजारपेठेचे गणित अवलंबून असते. त्यामुळे मान्सूनचा पाऊस कसा आणि किती होईल याकडे सर्वांचेच लक्ष असते. त्यातच जिल्ह्याच्या पश्चिम बाजूच्या जावळी, पाटण, सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यांत धुवाधार पाऊस होतो. जून ते ऑगस्ट हे तीन महिने या तालुक्यांत पाऊस उसंतच घेत नाही. यावर्षीही पश्चिम भागात आतापर्यंत पावसाने दमदार बॅटिंग केलेली आहे. यामुळे पेरणी खोळंबलीय. तसेच प्रमुख धरणांत ही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. तर कोयनानगरच्या पावसानेही विक्रमाची नोंद केलेली आहे.

पाटण तालुक्याच्या पश्चिम भागातील कोयना खोऱ्यात जोरदार पाऊस होतो. यावर्षी जून महिन्याच्या मध्यापासून पावसाने कोयना धरणक्षेत्रात संततधारेला सुरूवात केली. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांतच या पावसाने मागील १० वर्षांतील जून मधील विक्रमी पावसाची नोंद केली. मागील १० वर्षांची कोयनानगरची सरासरी काढली तर साधारणपणे ८०० ते ९०० मिलीमीटर पाऊस होतो. पण, यंदा जूनमध्ये तब्बल १ हजार ४६४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. यामुळे कोयनानगरच्या पावसाने १० वर्षांतील नवीन विक्रम नोंदवला. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील नवजा, पाथरपूंज आणि महाबळेश्वर येथेही यंदा मागील वर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. यामुळे कोयना धरणात ही जून महिन्यातच ५० टीएमसीवर पाणीसाठा झाला. धरण जवळपास ५० टक्के भरले होते. हेही मागील १० वर्षांतील विक्रमच ठरला आहे.

कोयनानगरचा १० वर्षांतील जूनचा पाऊस... -

वर्ष पाऊस (मिलीमीटरमध्ये)
२०१५- १०८२

२०१६- १०८१
२०१७- ९७३

२०१८- ९७५
२०१९- ५२०

२०२०- ७४४
२०२१- ९२४

२०२२- २६९
२०२३- ४०४

२०२४- ७७१
२०२५- १४६४

कोयनेला आतापर्यंत १८०६ मिलीमीटरची नोंद...
जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०७, नवजा १२९ आणि महाबळेश्वरला ४९ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून कोयनेला १ हजार ८०६, नवजा १ हजार ५९६ आणि महाबळेश्वरला १ हजार ६८५ मिलीमीटर पाऊस पडलाय. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ६१.५२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ५८.४५ टक्केवारी झाली आहे.

यावर्षी मे महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. या हवामानीय स्थितीमुळे मान्सूनच्या वेळेच्या आधी अनुकूल वातावरण निर्माण झाले. तसेच त्यामुळे जून महिन्यातही पावसाची तीव्रता कायम राहिली. अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्याच्या काही भागात खरीप हंगामातील पेरणी खोळंबली. तर काही ठिकाणी भात पीक पिवळे पडण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पीक व्यवस्थापनाचे नवे आव्हान निर्माण झालेले आहे.
- प्रा. डाॅ. सुभाष कारंडे, छत्रपती शिवाजी काॅलेज सातारा

Web Title: Koyane records highest rainfall in 10 years in June; water storage reaches 50 TMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.