जोर वाढला; कोयनेचा पाऊसही हजारी; धरणात २५ टीएमसी साठा, नवजाला ५४ मिलिमीटरची नोंद
By नितीन काळेल | Updated: July 16, 2023 14:12 IST2023-07-16T14:12:35+5:302023-07-16T14:12:50+5:30
जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊन तीन आठवडे झाले आहेत. आतापर्यंत पश्चिम भागातच चांगला पाऊस झालेला आहे.

जोर वाढला; कोयनेचा पाऊसही हजारी; धरणात २५ टीएमसी साठा, नवजाला ५४ मिलिमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढत चालला असून रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ६५, नवजा येथे ५४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढली असून पाणीसाठा २५ टीएमसी झाला आहे. त्याचबरोबर नवजा, महाबळेश्वरनंतर कोयनेच्या पावसानेही आता एक हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे.
जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊन तीन आठवडे झाले आहेत. आतापर्यंत पश्चिम भागातच चांगला पाऊस झालेला आहे. तर पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र, पश्चिमेकडे तीन आठवड्यात चांगला पाऊस झाला. सुरुवातीला जोरदार पाऊस झाला. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले. तसेच धरणातील पाणीसाठाही वाढू लागला. पण, असे असतानाच मागील आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. तसेच उघडझापही सुरू होती. त्यामुळे पाऊस दडी मारणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शनिवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.
पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ६५, नवजा ५४ आणि महाबळेश्वरला ४१ मिलिमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १००९ मिलिमीटरची नोंद झाली. तर नवजाला १४२६ आणि महाबळेश्वर येथे १४७३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढत आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ७१२९ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा २४.९६ टीएमसी झाला होता. तरीही गतवर्षीपेक्षा यंदा धरणात पाणी कमीच आहे.