खंडाळा नगर पंचायत निवडणूक : भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 07:37 PM2022-01-14T19:37:56+5:302022-01-14T19:38:32+5:30

अतिशय चुरशीने होणाऱ्या या निवडणुकीत प्रमुख पक्ष रिंगणात उतरले आहेत. वास्तविक या चारही प्रभागांत भाजपचे प्राबल्य राहिले आहे.

Khandala Nagar Panchayat Election NCP's fight against BJP | खंडाळा नगर पंचायत निवडणूक : भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची झुंज

खंडाळा नगर पंचायत निवडणूक : भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची झुंज

googlenewsNext

खंडाळा : खंडाळा नगर पंचायतीच्या निवडणुकीची पुन्हा रणधुमाळी सुरू झाली आहे. येथील उर्वरित चार जागांसाठी निवडणूक होत आहे. अतिशय चुरशीने होणाऱ्या या निवडणुकीत प्रमुख पक्ष रिंगणात उतरले आहेत. वास्तविक या चारही प्रभागांत भाजपचे प्राबल्य राहिले आहे. तरीही सत्ताधारी भाजपला कडवी झुंज देण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.

नगर पंचायत निवडणुकीत या चार जागांसाठी सर्व पक्षांच्या इच्छुकांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, अर्ज माघारीच्या वेळी अनेकांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला. प्रमुख पक्षांनी उमेदवारांना अंतिम क्षणी पक्षाचे संमतीपत्र देऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

वास्तविक हे चारही प्रभाग सुरुवातीला ओबीसींसाठी राखीव ठेवले गेले होते. मात्र, त्यानंतर ते रद्द झाल्याने हे प्रभाग खुले झाले. तरीही स्थानिक कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या भावना लक्षात घेऊन येथे ओबीसी उमेदवारांनाच संधी देण्याकडे प्रमुख पक्षांचा कल राहिला आहे. तरीही काही उमेदवार खुल्या प्रवर्गातून लढत आहेत. प्रभागांचा ताळमेळ राखत उमेदवारी दिल्याने या लढती चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत.

खंडाळा शहराच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादीचा कडवा संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच गत पाच वर्षांच्या राजकीय सत्तापटलावर अनेक स्थित्यंतरे घडली. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी अस्तित्व पणाला लावले आहे. खंडाळ्यातील हे प्रभाग मूळ गावातच येत असल्याने येथे स्थानिक नेतृत्वांचा मोठा प्रभाव आहे. त्यातच इतर ठिकाणच्या निवडणुका पार पडल्याने सर्वांनी याच जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या लढतीकडे लागल्या आहेत.

प्रमुख पक्षांनी बांधले आखाडे

या अगोदर झालेल्या तेरा प्रभागांच्या निवडणुकीतील प्रचाराचा रागरंग पाहता, प्रमुख पक्षांनी आपल्याला किती यश मिळणार, याचे आडाखे बांधले आहेत. नगर पंचायतीची सत्ता भाजपला राखायची असेल किंवा राष्ट्रवादीला खेचून आणायची असेल तर या चार प्रभागांत जास्तीत जास्त यश मिळविणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन निवडणुकीत रंगत आणल्याचे पाहायला मिळते.

काँग्रेसची ऐनवेळी माघार

चार जागांच्या या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीच्या सरळ लढतीत काँग्रेसने ऐनवेळी माघार घेतली असली, तरी एका प्रभागात शिवसेनेने शड्डू ठोकला आहे. तर एका जागेसाठी शहरात पहिल्यांदाच राष्ट्रीय समाज पक्षाने उडी घेतली आहे. त्यामुळे या प्रभागात त्यांचा किती ठसा उमटतो, यावर निवडणुकीचे चक्र फिरणार आहे.

Web Title: Khandala Nagar Panchayat Election NCP's fight against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.