Issue of wild animals entering human habitats raised | शेतकऱ्यांवर अस्मानीबरोबरच वन्य संकटही!
शेतकऱ्यांवर अस्मानीबरोबरच वन्य संकटही!

प्रगती जाधव-पाटील 

सातारा - वन्यजीवांच्या अधिवासात मानवाचा शिरकाव वाढला. जंगले संपुष्टात येवू लागल्याने वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान मानववस्ती होवू लागली आणि त्यानंतर वन्यप्राणी आणि मानव संघर्षाला सुरुवात झाली. ताज्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यात राज्यातील १२ व्यक्तींचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, तर ८ हजार ८४५ जणांच्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसार झाल्याचे उघड झाले आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये मनुष्य आणि वन्य प्राणी यांचा संघर्ष आता नित्याचा झाला आहे. वनक्षेत्रात भक्ष मिळेपर्यंत वन्यप्राणी जंगलात फिरून शिकार करणं पसंत करतात. वन क्षेत्रात अन्नाची उपलब्धता नसल्याने शिकार आणि पाण्याच्या शोधार्थ वन्य प्राणी जंगल सोडून मानववस्तीकडे वळतात. मुळातच वन्यक्षेत्रात केलेले अतिक्रमण, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरांमुळे वन्यप्राणी मानवाचे शेजारी म्हणूनच वावरताना दिसतात.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगराशेजारी शेतात बसून काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ले केले आहेत. खाली बसलेले मानव भक्ष समजून हा हल्ला होतो. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

अनेक ठिकाणी रानडुकरांकडून शेतीचे नुकसान केले जाते. उभ्या पिकात रानडुकरांची टोळी शिरली तर त्यांच्या पायाने ते पूर्ण शेतातील धान्याचे नुकसान करतात. या टोळीला हुसकावून बाहेर काढणंही शेतकऱ्यांना मुश्किल होते. रानडुकरांमुळे भात शेतीला मोठा फटका बसतो. विशेष म्हणजे यात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाच्या अवघ्या वीस टक्केच भरपाई मिळते.

वन्य प्राण्यांमुळे हानी (३१ जुलै अखेर राज्यातील आकडेवारी)

१३३ व्यक्तींवर वन्य प्राण्यांचा हल्ला

१२ व्यक्तींचा प्राणी हल्ल्यात मृत्यू

२८ पाळीव प्राण्यांवर जिवघेणा हल्ला

२,५०६ पाळीव प्राण्यांचा वन्य जीव प्राणी हल्ल्यात मृत्यू

८,८४५ जणांच्या शेतींचे वन्यप्राण्यांकडून नुकसान

पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना मोरांचाही त्रास सोसावा लागतो. शेतात पेरलेले धान्य हे मोराचे खाद्य ठरते. तर शेतातील भुईमुग उपटून त्याच्या शेंगा खाणारी माकडं आणि बटाटा, मुळा, गाजर आदी जमिनीतील पिकं जमीन भुसभूशीत करून खाणारे साळिंदर यांनी केलेले नुकसान वन विभागाच्या नोंदीतच नाही.

वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यास अशी मिळते आर्थिक मदत

नुकसान भरपाईसाठी शासननिर्णय ११ जुलै २०१८ रोजी झाला. त्यानंतर त्यात २८ नोव्हेंबर २०१८ मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या वारसाला १० लाखाऐवजी १५ लाख रुपये देण्याची दुरूस्ती करण्यात आली.

शेतीचे नुकसान - पिकाच्या उत्पादकतेवर सरासरी ८०० रुपये गुंठा या दराने मोबदला दिला जातो.

पाळीव प्राणी मृत्यू - गायी, म्हेशी, बैल ६० हजार किंवा बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम

शेळी मेंढी १० हजार किंवा बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम

मनुष्य मृत्यू - १५ लाख रूपयांपर्यंत वारसांना मोबदला

मनुष्य किरकोळ जखमी - २० हजार किंवा औषधोपचाराचा संपूर्ण खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल ती

मनुष्य कायम अपंगत्व - पाच लाख रुपये

मनुष्य गंभीर जखमी - सव्वा लाखापर्यंत खर्च

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना किंवा शेतीचं नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे केले जातात. त्यानंतर शासकीय निकषांनुसार संबंधितांना नुकसान भरपाई दिली जाते.

- सचिन डोंबाळे, वनक्षेत्रपाल, फिरते पथक, सातारा
 

Web Title: Issue of wild animals entering human habitats raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.