माणदेशी चारा छावणी बंदचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:28 IST2019-04-29T00:28:46+5:302019-04-29T00:28:51+5:30
म्हसवड : येथील माणदेशी फाउंडेशनमार्फत सुरू असलेली चारा छावणी आर्थिक आणीबाणी व पाणी उपलब्ध होत नसल्याने छावणीचालकांनी बंद करण्याचा ...

माणदेशी चारा छावणी बंदचा निर्णय
म्हसवड : येथील माणदेशी फाउंडेशनमार्फत सुरू असलेली चारा छावणी आर्थिक आणीबाणी व पाणी उपलब्ध होत नसल्याने छावणीचालकांनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे माणदेशी फाउंडेशनचे संचालक विजय सिन्हा यांनी सांगितले. दरम्यान, छावणी बंद होऊ नये. या खासगी छावणीचे शासकीय अनुदानित छावणीत रूपांतर होण्यासाठी, तसेच उरमोडीचे पाणी म्हसवड परिसरातील माणगंगेत येण्यासाठी आमदार जयकुमार गोरे, विजय सिन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेणार असल्याचे सांगितले.
माणदेशी फाउंडेशन संचलित जनावरांच्या चारा छावणीत जनावरांसोबत मुक्कामी असलेल्या ६४ गावांतील सुमारे चार हजार शेतकरी कुटुंबांची शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत सिन्हा बोलत होते. यावेळी माणदेशी फाउंडेशनचे उपाध्यक्ष जवाहर देशमाने, करण सिन्हा, रवी वीरकर, आदी प्रमुख उपस्थित होते. सिन्हा म्हणाले, ‘सध्या चारा छावणीत साडेनऊ हजार जनावरांना रोज सहा लाख लिटर पाण्याची गरज असून, म्हसवड भागात शोधूनही पुरेसे पाणीच उपलब्ध होऊ न शकल्यामुळे येथील माणदेशी फाउंडेशन संचलित जनावरांची चारा छावणी बंद करण्याचा दु:खद असा निर्णय घ्यावा लागत आहे.
माण तालुक्यात दुष्काळाच्या संकटामुळे जनावरांना चारा आणि पाणी मिळत नसल्याने दुभती जनावरे मिळेल त्या किमतीत शेतकरी विकत आहेत. माणमधील शेतकऱ्यांना संकटातून वाचविण्यासाठी शासनाच्या निर्णयाची वाट न पाहता माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून एक जानेवारीपासून जनावरांची छावणी सुरू करण्यात आली. त्यासाठी मुंबई येथील बृहत भारतीय समाज व बजाज कंपनीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला. आज सुमारे साडेनऊ हजार जनावरे व त्यासोबत चार हजार कुटुंबे या छावणीत साडेतीन महिने मुक्कामी राहिली आहेत.
कागदोपत्री पूर्तता किचकट
सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे विहिरी आटल्याने पाणीच उपलब्ध नसल्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत. शासकीय अनुदानातून छावणी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदोपत्री पूर्तता किचकट असल्याने सोमवारी मुंबई येथे भेट घेण्यात येणार असल्याचे सिन्हांनी सांगितले.