Highway accident : महामार्गावर शेकडो जिवघेणे 'शॉर्टकट'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 16:05 IST2021-12-20T16:05:06+5:302021-12-20T16:05:44+5:30
संरक्षक जाळीची मोडतोड करून तसेच दुभाजकाचे कठडे फोडून स्थानिक महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. हाच जीवघेणा प्रयत्न अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय.

Highway accident : महामार्गावर शेकडो जिवघेणे 'शॉर्टकट'
प्रगती जाधव-पाटील
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी छेदरस्ता, पायपूल आहेत; पण स्थानिकांनी अनेक ठिकाणी ‘शॉर्टकट’ बनवलेत. संरक्षक जाळीची मोडतोड करून तसेच दुभाजकाचे कठडे फोडून स्थानिक महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. पायी चालत नव्हे, तर चक्क दुचाकी दुभाजकावर चढवून महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न होतोय आणि हाच जीवघेणा प्रयत्न अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय.
पुणे-बंगळुरू महामार्ग छेद रस्त्याशिवाय ओलांडता येऊ नये, यासाठी सातारा व कोल्हापूर लेनच्या मध्यभागी दुभाजक बांधण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी दुभाजकावर संरक्षक जाळ्याही उभारण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही कठडे फोडून तसेच संरक्षक जाळीचे लोखंडी रेलिंग कापून ‘शॉर्टकट’ बनविण्यात आले आहेत. भुयारी मार्ग, छेदरस्ता, पायपुलाकडे जाण्यासाठी वाढीव प्रवास करावा लागतो. त्यामध्ये वेळ जातो. हे टाळण्यासाठीच असे ‘शॉर्टकट’ बनविण्यात आले आहेत. मात्र, महामार्गावरील हे ‘शॉर्टकट’ अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.
‘शॉर्टकट’मधून अचानक कोणीतरी आडवे येते. त्यावेळी चालकाला वाहन नियंत्रित होत नाही आणि पादचारी, दुचाकीस्वाराला धडक देऊन संबंधित वाहन पुढे मार्गस्थ होते. गत दोन वर्षांत असे शेकडो अपघात घडले आहेत. मात्र, तरीही अनेकजण जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडताना दिसतात.
जोडरस्ते बनविले कोणी..?
महामार्गावरून सेवा रस्त्यावर जाण्यासाठी काही अधिकृत जोडरस्ते आहेत. मात्र, महामार्गानजीक अनेक ढाबे, हॉटेल आणि व्यावसायिकांनी अनधिकृतपणे जोडरस्ते बनवलेत. हे जोडरस्तेही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी महामार्गाच्या लगत असलेल्या जागेत खुर्ची टाकून हॉटेलकडे ग्राहकांना वळविण्यासाठी पगारी माणसाची नेमणूक केली गेली आहे. वाहनांच्या वेगाचा विचार न करता रात्रीच्यावेळी त्याच्या हातातील टॉर्चचा उजेड थेट डोळ्यावर आल्यानेही वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाले आहेत.
पायपूल असून अडचण, नसून खोळंबा
महामार्गावर गौरीशंकर कॉलेज परिसरात आंदोलन करून उभा करण्यात आलेल्या पायपुलाचा वापर श्वान करत असल्याचे पाहायला मिळते. वळसा घालून चढ-उतार करण्यापेक्षा स्थानिकांना महामार्ग ओलांडणे अधिक सुखाचे वाटते. कऱ्हाडमध्ये कोल्हापूर नाक्यानजीक महामार्ग ओलांडण्यासाठी पायपूल आहे. मात्र, या पायपुलाचा क्वचितच वापर होतो. बहुतांश नागरिक धोकादायकरीत्या शॉर्टकटनेच महामार्ग ओलांडतात.
अपघाती ठिकाणे
- शिवडे फाटा
- इंदोली फाटा
- उंब्रज फाटा
- खोडशी
- वहागाव
- कोल्हापूर नाका
- कोयना वसाहत
- नांदलापूर फाटा
- पाचवड फाटा
- मालखेड फाटा