Satara Politics: खोडा घालू नका, युती धर्म पाळा, अन्यथा.. मंत्री शंभूराज देसाईंचा 'भाजप'ला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:51 IST2025-11-03T13:50:45+5:302025-11-03T13:51:32+5:30
'मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे'

Satara Politics: खोडा घालू नका, युती धर्म पाळा, अन्यथा.. मंत्री शंभूराज देसाईंचा 'भाजप'ला इशारा
सातारा : महायुतीमध्ये एकत्र असतानाही कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो आम्ही किती दिवस सहन करायचा? असा सवाल करत शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्षाला सणसणीत इशारा दिला. असे कृत्य करणाऱ्यांना ‘जशास तसे उत्तर’ द्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मेढा येथे शिवसेनेच्या वतीने शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पालकमंत्री म्हणून माझ्यावर जिल्ह्याची मोठी जबाबदारी आहे. धनुष्यबाण हा महायुतीचाच आहे, तरीही महायुतीतील लोक धनुष्यबाण असलेले बोर्ड काढायला लावत असतील, तर हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा? आम्ही सामंजस्याची भूमिका घेत असू, तर आमच्याच लोकांना त्रास देणे चुकीचे आहे.
मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे,’असा इशारा देत ते म्हणाले, माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला, तर मला पालकमंत्र्यांच्या भूमिकेतून बाहेर यावे लागेल. पक्षामध्ये खासदार, आमदार यांच्यापेक्षा मोठा सर्वसामान्य शिवसैनिकच आहे. मेढा असो वा कुठलाही शिवसैनिक, त्याच्या पाठीमागे पालकमंत्री म्हणून मी ठामपणे उभा राहणार आहे.
शिवसेनेची अवहेलना करू नका..
आगामी निवडणुकीत आपल्याला महायुती म्हणूनच लढायचे आहे, पण शिवसेनेची ताकदही कायम राखायची आहे, शिवसेनेचा मान-सन्मान जपायचा आहे. जर शिवसेनेची अवहेलना केली, शिवसैनिकाला तुच्छ लेखले किंवा दमदाटी केली, तर शिवसेना स्वबळावर लढून आपली ताकद काय आहे हे दाखवून देईल. शिवसेनेसाठी स्वाभिमान महत्त्वाचा आहे, असेही मंत्री देसाई म्हणाले.
भूमिका वेगळी असू शकते..
पदाधिकाऱ्यांनी गाफिल राहू नये, असा सल्ला देत त्यांनी स्पष्ट केले की, महायुतीचा प्रयोग करताना शिवसेनेचा अपमान होईल, तिची ताकद कमी होईल, किंवा शिवसैनिकाला त्रास होईल हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. चर्चेतून मार्ग न निघाल्यास शिवसेनेची भूमिका वेगळी असू शकते, असे संकेतही त्यांनी दिले.