कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन करावे लागेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 12:58 IST2022-01-04T12:57:44+5:302022-01-04T12:58:10+5:30
रुग्णांची संख्या वाढू लागली तर सरकारला कठोर निर्णय घ्यावाच लागेल.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन करावे लागेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत
सातारा : पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तेथील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करावे लागू शकते, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
नायगाव, ता. खंडाळा येथील सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने अजित पवार आले होते. नायगाववरून ते थेट साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आले. साताऱ्यात राष्ट्रवादी भवनामध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ‘रुग्णांची संख्या वाढू लागली तर सरकारला कठोर निर्णय घ्यावाच लागेल. लोक इतर वेळी जरी मास्कचा वापर करीत असले तरी एकमेकांशी बोलताना किंवा नाश्ता, चहाला एकत्रित आले असताना ते मास्कचा वापर करीत नाहीत. त्यातूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.
अजित पवार म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कमी पडली. निवडणुकांमध्ये यश-अपयश चालतच असते. आता पुढे काय करावं ते राणेंनी ठरवावं. आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १४ जागा बिनविरोध केल्या. सातारा, सांगली या जिल्हा बँकांमध्येदेखील आम्हाला यश आलेले आहे. आता इथून पुढच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे कसे टिकेल, तसेच जनतेला योग्य दिशेने नेण्यासाठी निर्णय घेण्याचे काम आमचे सरकार करील.
ओबीसी समाजास राजकीय आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे इम्पिरिकल डेटा गाेळा हाेऊ द्या, ताेपर्यंत निवडणुका नकाेत अशी भूमिका आहे. ओबीसी इम्पिरिकल डेटा गाेळा करण्यासाठी समितीने दाेन महिन्यांची मुदत मागितली आहे; परंतु तीन महिने लागले तरी चालतील. जाेपर्यंत ओबीसी समाजास आरक्षण मिळत नाही ताेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार नाही. ताेपर्यंत स्थानिक संस्थांमध्ये प्रशासक नेमावे लागले तरी चालतील.’
एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात होता असे भाजपचे नेते सांगतात, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या एकत्रित जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा होता. मात्र, पुढच्या काळामध्ये जे बदल होत गेले, त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबतच तिसऱ्या पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागले आहे. हे चित्र बदलले यामुळेच हा मुद्दा आम्हाला पुढे नेता आलेला नाही.
राणे अनेकदा फसलेत...
महाविकास आघाडीचे सरकार सहा महिन्यांत, एक वर्षात, दीड वर्षात पडेल, असे विरोधक वेळोवेळी घोषणाबाजी करीत होते. मात्र, तरीही हे सरकार दोन वर्षे खंबीरपणे टिकले आहे. आता सरकार पाडण्यासाठी राणेंवर जबाबदारी दिलेली आहे. यापूर्वीही १९९९ ते २००४ या काळातील आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांनी सहा आमदारांना फोडले होते. प्रलोभने दाखवली तरीसुद्धा सरकार टिकले. राणे यांनी फार पूर्वीपासून असे प्रयत्न केले. मात्र ते फसले अशी खरमरीत टीकादेखील अजित पवार यांनी केली.