सातारा : मी जनता दरबार भरवत नाही. कारण दरबार हा सरदाराचा असतो. मी जनतेचा सेवक आहे. त्यामुळे माझ्याकडे मोठ्या संख्येने लोक कामासाठी येतात, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अप्रत्यक्षरित्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. तर वयाच्या हिशोबाने सर्व अधिकार त्यांना बहाल केले आहेत. त्यांना त्रास व्हायला नको, असेही मंत्री गोरे यांनी रामराजे यांच्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिले.सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजपाच्या आठ मंत्र्यांची विकेट जाणार असून त्यात गोरे यांचे नाव असल्याचे भाकीत उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. या अनुषंगाने मंत्री गोरे म्हणाले, राऊत यांच्या भाकितासंदर्भात मी कसा काय बोलू शकतो? कदाचित भाजपची यादी संजय राऊत यांच्याकडून फायनल होऊन आमच्या वरिष्ठांकडे जात असेल!जिल्हा परिषद शिक्षकांनी बदलीसाठी चुकीची कागदपत्रे सादर केल्याच्या अनुषंगाने गोरे म्हणाले, संवर्ग १ मध्ये समावेश आणि बदलीपासून संरक्षण यासाठी काही जणांनी बनावट दिव्यांगत्व, आजारांचे दाखले देण्याचा प्रयत्न झाला. काहींनी तर कागदोपत्री घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले. लाभासाठी चुकीचे दाखले मिळवणारे दाखले आहेत. दाखले घेणारे आणि देणारे दोघेही दोषी आहेत. याप्रकरणी योग्य रीतीने कारवाई सुरू असल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे कौतुक केले.स्थानिक पातळीवर जिल्हा परिषदेचा निर्णयस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक परिस्थितीवर अवलंबून राहतात. पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला, तर अंमलबजावणीची जबाबदारी आमची आहे, तरीही वरिष्ठांची आणि आमची इच्छा असूनही काही ठिकाणी एकत्र लढता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून वेगळे निर्णय घेतले जातील, असे गोरे यांनी स्पष्ट केले.
त्याबाबत माहिती नाही..
- वाळवा येथील जिल्ह्यातील युवा ठेकेदाराने आत्महत्या केल्याबाबत सविस्तर माहिती घेऊन अधिक भाष्य करता येईल.
- शेखर गोरे यांना महामंडळावर पद देण्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याबाबत काहीही माहिती नाही.
- राज्यात दीड ३० लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
- सोलापूरची जबाबदारी असली तरी जन्मभूमी-कर्मभूमी साताराकडे दुर्लक्ष होणार नाही.