साताऱ्यातील किती खेळाडूंनी घेतला स्टेरॉईडचा डोस, पोलिस घेताहेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:22 IST2025-05-08T15:22:09+5:302025-05-08T15:22:20+5:30

जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र हादरले

How many players in Satara took a dose of steroids police are collecting information | साताऱ्यातील किती खेळाडूंनी घेतला स्टेरॉईडचा डोस, पोलिस घेताहेत माहिती

साताऱ्यातील किती खेळाडूंनी घेतला स्टेरॉईडचा डोस, पोलिस घेताहेत माहिती

सातारा: बेकायदेशीर स्टेरॉईड इंजेक्शनची विक्री करणाऱ्या राष्ट्रीय मल्लाला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आता वाढू लागली आहे. गेली कित्येक वर्षे साताऱ्यातील खेळाडूंना स्टेरॉईडचा पुरवठा केला जात होता. यातील किती खेळाडूंनी स्टेराॅईडचा डोस घेतला, याची माहिती आता पोलिस घेताहेत. यामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासह खेळाडूंमध्ये अस्वस्थता पसरलीय.

साताऱ्यातील राष्ट्रीय मल्ल शिवराज पंकज कणसे (२५, रा. हिलटॉप सोसायटी, सदर बझार, सातारा) याला चार दिवसांपूर्वी सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने शिकाऊ डाॅक्टर साईकुमार महादेव बनसोडे (वय २५, रा. भोसे ता. पंढरपूर, सोलापूर), सुदीप संजय मेंगळे (वय १९, रा. सदर बझार, सातारा), अतुल विलास ठोंबरे (२०, रा. झेडपी काॅलनी, शाहूपुरी, सातारा) यांची नावे सांगितली. यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. या तिघांच्या चाैकशीतून मुख्य सूत्रधार तय्यब खान (वय २३, रा. मुलूंड, मुंबई) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्यालाही मुंबईतून अटक केली. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण पाचजणांना पोलिसांनी अटक केलीय. 

पण आता पाचजणांच्या टोळीने साताऱ्यातील किती खेळाडूंना हे स्टेराॅईडचे इंजेक्शन विकले, याची माहिती आता पोलिसांकडून घेतली जातेय. मागील काही वर्षांत साताऱ्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. या खेळाडूंनी या स्टेराॅईडचा वापर केला होता का, याचीही माहिती अटकेतील आरोपींकडून घेतली जातेय. ज्यांनी ज्यांनी हे इंजेक्शन घेतले आहे, त्यांचीही चाैकशी केली जाणार आहे. या चाैकशीच्या फेऱ्यामध्ये आपण अडकले जाऊ, या भीतीने अनेक खेळाडू साताऱ्यातून गायब झाले आहेत. जर खेळाडू यात गोवले गेले तर यापूर्वी स्पर्धेमध्ये मिळवलेल्या पदकावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. 

हे प्रकरण वरकरणी क्षुल्लक वाटत असले तरी याचा खेळाडूंच्या आरोग्यावर होणारा दूरगामी परिणाम कोणाच्याही लक्षात न येण्यासारखा आहे. असे पोलिस सांगताहेत. या प्रकरणात सखोल तपास करून साताऱ्यातील क्रीडा क्षेत्रात सुरू असणारा हा जीवघेणा खेळ थांबविण्यासाठी पोलिसही सरसावले आहेत.

कसा झाला उलगडा..

सातारा शहर पोलिसांनी हद्दपारीचे उल्लंघन केले म्हणून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ मेफेंटरमाइन नावाचे इंजेक्शन सापडले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर त्याने हे इंजेक्शन राष्ट्रीय मल्ल शिवराज कणसे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी कणसेकडून तब्बल ३० इंजेक्शन हस्तगत केली.

हे इंजेक्शन खेळाडू का वापरतात?

मेफेंटरमाइन हे इंजेक्शन उत्साह आणि ताकद वाढविणारे आहे. अनेक खेळाडू स्पर्धेच्या अगोदर काही मिनिटे हे इंजेक्शन स्वत: किंवा मित्रांकरवी टोचून घेतात. या इंजेक्शनमुळे खेळाडूंची उत्तुंग कामगिरी स्पर्धेत होते.

Web Title: How many players in Satara took a dose of steroids police are collecting information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.