साताऱ्यात सापडला ऐतिहासिक ठेवा!, संवर्धनाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:51 IST2025-10-20T12:50:43+5:302025-10-20T12:51:16+5:30
समर्थ मंदिर परिसरात विहीर दृष्टिक्षेपात

साताऱ्यात सापडला ऐतिहासिक ठेवा!, संवर्धनाची गरज
सातारा : मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारा नगरीत इतिहासाच्या खुणा आजही जपल्या जात आहेत. याच शृंखलेतील एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक विहीर नुकतीच समर्थ मंदिर परिसरात इतिहास अभ्यासकांच्या दृष्टिक्षेपात आली आहे. ही विहीर रचनेत शुक्रवार पेठेतील सुप्रसिद्ध बाजीराव विहिरीप्रमाणे असून, तिच्या बांधकाम शैली, चिन्हे आणि शिल्पे यावरून ती छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळातील असावी, असे मत इतिहास अभ्यासक नीलेश झोरे व अथर्व घोगळे यांनी व्यक्त केले आहे.
बाजीराव विहिरीशी साधर्म्य..
शाहू महाराजांच्या काळात बांधलेल्या जलमंदिर पॅलेसजवळील बाजीराव विहिरी प्रमाणेच या विहिरीला देखील खाली उतरण्यासाठी सुंदर पायऱ्या आणि कमानी आहेत, जी तत्कालीन जलस्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना दर्शवते. इमारतींच्या गर्दीत अनेक वर्षे लपून राहिल्यामुळे ही अखीव-रेखीव आणि देखणी विहीर दुर्लक्षित राहिली होती.
ऐतिहासिक महत्त्व :
छत्रपती राजाराम महाराजांनी राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे आणली आणि याच किल्ल्यावरून छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकला. शाहू महाराजांच्या काळात शहरात अनेक तलाव, हौद आणि विहिरी बांधल्या गेल्या, ज्या एकेकाळी सातारकरांची तहान भागवत होत्या. या विहिरी त्याच वैभवशाली जलव्यवस्थापन परंपरेचा भाग आहेत.
दुर्लक्षित वारसा; संवर्धनाची गरज
दुर्दैवाने, हा ऐतिहासिक ठेवा सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे विहिरीच्या आत कचऱ्याचे साम्राज्य आणि अवतीभवती झुडपांची वाढ झाली आहे. यामुळे रस्त्यापासून अगदी जवळ असूनही ती सहजासहजी दिसत नाही. ज्या विहिरींनी एकेकाळी सातारकरांचे जीवन सुजलाम सुफलाम केले, आज त्यांचीच अवस्था बिकट झाली आहे.
छत्रपती शाहू महाराज यांनी १७२० मध्ये सातारा शहराची स्थापना केली. शहराची रचना करताना गडाची पूर्वीची माची म्हणजे सध्याची नगरपालिका ते समर्थ मंदिर असाच वरचा सर्व भाग राजघराण्यासाठी राखीव होता. तेथे छत्रपती घराण्यासंबंधितच विहिरी बांधण्यात आल्या होत्या. वेशीवरच्या मारुती मंदिराजवळ आढळलेल्या या विहिरीची रचना पाहता ती शाहू महाराज कालीन असावी. पूर्वी या विहिरी पासून जवळच छत्रपतींचे सरदार डफळे यांचा वाडा होता. अशा विहिरी, हौद ही पूर्वीच्या शहराच्या पाणी व्यवस्थेचे पुरावेच म्हणता येतील. या विहिरीविषयी अजून ही माहिती घेण्याचे काम सुरू असून, हा अमूल्य ठेवा जतन करण्याची गरज आहे.