सातारा : जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली असून आतापर्यंत कोयनानगरला तब्बल १ हजार ४६४ तर महाबळेश्वरला १ हजार ३७६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच धरणातीलपाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कोयनेत तर ५१.२० टीएमसी साठा झाला आहे. धरण जवळपास अर्धे भरले आहे. तर आता उरमोडी धरणाच्या वक्र दरवाजातूनही विसर्ग सुरू करण्यात येत आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस सुरू झाला. मागील १५ दिवसांपासून पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात संततधारसारखा पाऊस पडत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे. तसेच या पावसामुळेच ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत. त्यातच पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी यासारख्या प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस होत आहे. विशेष करुन कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे. यामुळे जून संपतानाच पश्चिमेकडील अनेक मोठी धरणे अर्ध्यावर भरली आहेत. पावसाळ्याचे अजून तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात मोठे पाणी प्रकल्प भरुन वाहू शकतात असा अंदाज आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८० मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजा येथे ६९ आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला १ हजार ४६४, महाबळेश्वरला १ हजार ३७६ आणि नवजाला १ हजार २६३ मिलिमीटर पाऊस पडला. तर कोयना धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने आवकही टिकून आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात २१ हजार २८१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ५१.२० टीएमसी पाणीसाठा झाला होता. ४८.६५ टक्के हा साठा आहे.
उरमोडी नदीकाठी सतर्कतेचा इशारा..सातारा तालुक्यात कण्हेर आणि उरमोडी धरण आहे. कण्हेर धरण १०.१० टीएमसी क्षमतेचे आहे. या धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे. धरणक्षेत्रात सध्या ६.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर धरणातून ७४० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तसेच आता उरमोडी धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू झाला आहे. ९.९६ टीएमसी धरणाची क्षमता आहे.
सोमवारी सकाळी धरणात ७.१४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. जवळपास ७२ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळपासून धरणाच्या वक्र दरवाजातून दीड हजार क्यूसेक पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर पूर्वी जलविद्युत प्रकल्पातून ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच होता. यामुळे आता उरमोडीतून २ हजार क्यूसेक विसर्ग होणार आहे. यामुळे उरमोडी नदीपात्राजवळील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.