सातारा जिल्ह्यात वळवाचा तडाखा, महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
By नितीन काळेल | Updated: May 22, 2025 18:54 IST2025-05-22T18:54:22+5:302025-05-22T18:54:57+5:30
रस्त्याला ओढ्याचे स्वरुप; पिके अन् बागांचे नुकसान

सातारा जिल्ह्यात वळवाचा तडाखा, महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
नितीन काळेल
सातारा : जिल्ह्यात तीन दिवसांपासून वळवाचा धुमाकूळ सुरू असल्याने दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्यात तसेच झाडेही उन्मळून पडलीत. शेती पिकांचे आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. तसेच रस्त्याला ओढ्याचे स्वरुप येत आहे. तर गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
मे महिना सुरू झाल्यापासून वातावरणात मोठा बदल झाला. १५ मे नंतर जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरू झाला आहे. मागील काही दिवसांत तर पाऊस पाठ सोडेना अशी स्थिती झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झाला आहे. सातारा शहरासह परिसरात तर सहा दिवसांपासून पाऊस पडतोय. सोमवारपासून तर धो-धो पाऊस पडत असल्याने रस्त्यावर दगड आणि माती आल्याने राडारोडा झाला आहे. काही ठिकाणी घरात आणि दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले. झाडे पडली आहेत.
त्यातच गुरूवारी सकाळपासूनच सातारा शहरात पाऊस सुरू होता. साडे आकरा वाजेपर्यंत पाऊस पडला. यामुळे नागरिकांना छत्री घेऊन तसेच रेनकोट घातल्याशिवाय घराबाहेर पडता आले नाही. जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागातही चांगला पाऊस हाेत आहे. यामुळे ओढे भरुन वाहत आहेत. बंधाऱ्यात पाणीसाठा झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यात ५५ मिलिमीटर पाऊस..
जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडत आहे. २४ तासात महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक ५५.७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर जिल्ह्यात सरासरी ३३.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
गुरूवारी सकाळी दहापर्यंतच्या २४ तासांत सातारा तालुक्यात ३४.९ मिलिमीटर पाऊस झाला. तर पाटण तालुक्यात ३०.८ मिलिमीटर, कऱ्हाडला ३३.८, कोरेगाव ३४.७, खटाव ३४.५, माण ३४.३, फलटण तालुका २४.३, खंडाळा २५.९ आणि वाई तालुक्यात ३५.१ मिलिमीटर पाऊस झाला. तर सर्वात कमी पाऊस जावळी तालुक्यात ४.१ मिलिमीटर झालेला आहे.