महाबळेश्वरमधील झाडाणीतील ६२० एकर जमीन खरेदी प्रकरणी २६ रोजी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:21 IST2025-11-18T16:20:56+5:302025-11-18T16:21:13+5:30
याप्रकरणी तीन-चार सुनावणी झाल्या. यात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, यांच्याकडे साताऱ्यासह, नंदूरबार जिल्ह्यात जमीन असल्याचे कागदपत्रांवर स्पष्ट झाले होते

महाबळेश्वरमधील झाडाणीतील ६२० एकर जमीन खरेदी प्रकरणी २६ रोजी सुनावणी
सातारा : झाडानी, ता. महाबळेश्वर येथील ६२० एकर जमीन खरेदी प्रकरणी दि. २६ नोव्हेंबरला अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. यावेळी सकाळी साडे अकरावा जता चंद्रकांत वळवी, संगीता वळवी, आरमान वळवी आणि आदित्य वळवी यांना आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी कमाल जमीन कायद्याचा भंग करत खरेदी केल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी तीन-चार सुनावणी झाल्या. यात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, यांच्याकडे साताऱ्यासह, नंदूरबार जिल्ह्यात जमीन असल्याचे कागदपत्रांवर स्पष्ट झाले होते.
सातारा, नंदूरबार हे दुसऱ्या महसूल विभागात येत असल्याने त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा स्तरावर घेण्याची तरतूद नाही. त्यामुळे शासन नियमानुसार याबाबत काय करायचे याचा प्रस्ताव शासनाकडे अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्याकडे पाठवला गेला होता. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांची याप्रकरणी चौकशी, सुनावणीसाठी नियुक्ती करण्यात आली.
त्यानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रकांत वळवी, संगीता वळवी, आरमान वळवी, आदित्य वळवी यांना चौकशीसाठी दि. २६ रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यावेळी तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सातारासह इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यांत धारण शेतजमिनीचे सात बारा उतारा, खरेदी दस्त, फेरफार व इतर आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहण्यास बजावले आहे.