जादा परताव्याच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक, सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा
By दत्ता यादव | Updated: October 11, 2023 14:08 IST2023-10-11T14:07:25+5:302023-10-11T14:08:17+5:30
पैसे गुंतवणे दोघांच्या आले अंगलट

जादा परताव्याच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक, सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा
सातारा : विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देतो, असे आमिष दाखवून तब्बल ३१ लाख ६६ हजारांची दोघांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानासाहेब बबन भोसले, सचिन प्रल्हाद पंडित, शीतल सचिन पंडित, जीवन प्रकाश शिर्के अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंदार शरद वाघ (वय ४६, रा. कृष्णकुंज, वृदांवन स्वामी विवेकानंदनगर, फलटण) यांना वरील संशयितांनी विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीत पैसे गुंतविल्यास जादा परतावा देतो, असे आमिष दाखविले. त्यामुळे वाघ यांनी वेळोवेळी १२ लाख दिले. त्याबदल्यात परतावा म्हणून ८१ हजार रुपये त्यांनी दिले.
मात्र, उर्वरित ११ लाख १९ हजारांची रक्कम मागितली असता फोन बंद करून उडवाउडवीची उत्तरे त्यांना देण्यात आली. तसेच पोपट चरणदास शिंदे यांचीही फसवणूक झाली असून, या दोघांची मिळून एकूण ३१ लाख ६६ हजार रुपयांची संशयितांनी फसवणूक केली. हा फसवणुकीचा प्रकार २०२२ ते २०२३ या कालावधीत घडला आहे. सहायक पोलिस निरीक्षक काकंडकी हे अधिक तपास करीत आहेत.