चिखली येथे अंगावर झाड पडून चार विद्यार्थी जखमी, उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:34 IST2025-08-20T12:30:40+5:302025-08-20T12:34:56+5:30
मार लागल्याने विद्यार्थी भयभीत

चिखली येथे अंगावर झाड पडून चार विद्यार्थी जखमी, उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल
सातारा : शाळेत चालत निघालेल्या चार मुलांच्या अंगावर उंबराचे झाड कोसळल्याने ही मुले जखमी झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
आयुष विलास बोरगे, जय संपत शिर्के (इयत्ता सातवी), आर्यन चंद्रकांत शिर्के (इयत्ता पाचवी), समर्थ दीपक शिर्के (इयत्ता दुसरी, सर्व रा. चिखली, ठोसेघर सातारा) अशी जखमी मुलांची नावे आहेत.
चिखली, ता. सातारा येथे रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंतीचे काम सुरू होते. मात्र, हे काम अपुरे आहे. या रस्त्यावरून मुले शाळेत निघाली होती. याच वेळी या भिंतीच्या वरील भराव आणि उंबराचे झाड या मुलांच्या अंगावर कोसळले. या घटनेची माहिती शिक्षक राजेंद्र घोरपडे तसेच संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांना थोडा मार लागल्याने विद्यार्थी भयभीत झाले होते.
या घटनेची माहिती प्रांताधिकारी आशिष बारकुल यांना समजताच ते तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे हेही दाखल होते. त्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना धीर देत वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे उपचार करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, या घटनेनंतर चिखली येथे घटनास्थळी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी जाऊन तत्काळ पाहणी केली.