Satara: पाच लाखांची लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह चौघे लाचलुचपतच्या जाळ्यात, कऱ्हाडात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:45 IST2025-03-26T15:44:55+5:302025-03-26T15:45:16+5:30
पदभार सोडला, तरीही सह्या

Satara: पाच लाखांची लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह चौघे लाचलुचपतच्या जाळ्यात, कऱ्हाडात कारवाई
कऱ्हाड (जि. सातारा) : येथील पालिकेतून बदली झालेले मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह चौघेजण लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. बांधकाम परवान्यासाठी दहा लाखांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना दोघांना साताऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. २४) रात्री सापळा रचून ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यासह चौघांवर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुख्याधिकारी शंकर खंदारे (रा. कऱ्हाड, मूळ रा. सातारा), सहायक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (सध्या रा. संकल्प प्राइड, देसाईनगर, कऱ्हाड, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा), बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफिक कयूम शेख (रा. कार्वेनाका, सुमंगलनगर, कऱ्हाड) व अजिंक्य अनिल देव, अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी स्वानंद शिरगुप्पे व तौफिक शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पदभार सोडला, तरीही सह्या
दरम्यान, मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची नुकतीच बदली झाली आहे. २० मार्च रोजी त्यांनी कऱ्हाड पालिकेचा पदभार सोडला आहे. मात्र, तरीही खासगी इसम अजिंक्य देव याच्यामार्फत त्यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या बांधकाम परवान्याबाबतच्या चलनांवर सह्या केल्याचे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे मुख्याधिकारी खंदारे याच्यासह इतर तिघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.