ट्रॅक्टर लावायचे, बोअरच्या मोटार काढून न्यायचे; साताऱ्यात शेतामधून चोरी करणाऱ्या चौघांना पकडले
By नितीन काळेल | Updated: July 12, 2024 18:53 IST2024-07-12T18:53:09+5:302024-07-12T18:53:49+5:30
सातारा : सातारा शहरालगतच्या खिंडवाडी परिसरातील शेतातून बोअरवेलमधील विद्युत मोटारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरुन नेणाऱ्या चाैघांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या. ...

ट्रॅक्टर लावायचे, बोअरच्या मोटार काढून न्यायचे; साताऱ्यात शेतामधून चोरी करणाऱ्या चौघांना पकडले
सातारा : सातारा शहरालगतच्या खिंडवाडी परिसरातील शेतातून बोअरवेलमधील विद्युत मोटारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरुन नेणाऱ्या चाैघांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या. संशयित हे खिंडवाडी गावातीलच आहेत. पोलिसांनी संबंधितांकडून सुमारे साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार याप्रकरणी सुरज साहेबराव जाधव (वय ३१), प्रसाद उर्फ बंटी अनिल चव्हाण (वय २५), सुरज अशोक चव्हाण (वय २८) आणि विशाल संपत क्षीरसागर (वय २८, सर्वजण रा. खिंडवाडी सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खिंडवाडीमधील शेतकऱ्यांच्या बोअरमधील विद्युत मोटारी चोरीस जात होत्या. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल होता.
या चोरीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार या पथकाने माहितीच्या आधारे चाैघांना खिंडवाडी परिसरातून ताब्यात घेतले. चाैघांनीही जानाई मळाई परिसरातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने बोअरवेलमधून विद्युत मोटारींची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेला ट्रॅक्टर, तीन मोबाईल, विद्युत मोटार असा एकूण ६ लाख ६५ हजारांचा एेवज जप्त केला आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजीत भोसले, नीलेश यादव, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले आदींनी कारवाईत सहभाग घेतला.