तेजोमय मशालींच्या प्रकाशाने किल्ले अजिंक्यतारा लखलखला, साताऱ्यात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:07 IST2026-02-19T14:06:55+5:302026-02-19T14:07:22+5:30
किल्ल्यावर अवतरला शिवकाल

तेजोमय मशालींच्या प्रकाशाने किल्ले अजिंक्यतारा लखलखला, साताऱ्यात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह
सातारा : सह्याद्रीच्या कुशीत फडकणारे भगवे ध्वज, ढोल-ताशांचा अंगावर शहारे आणणारा निनाद, हलगीचा कडकडाट आणि मशालींनी उजळून निघालेली ऐतिहासिक तटबंदी... अशा जाज्वल्य वातावरणात ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताऱ्यावर बुधवारी (दि. १८) रात्री ‘मशाल महोत्सव’ मोठ्या दिमाखात साजरा झाला. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या सोहळ्याने सातारा नगरीत जणू शिवकाल अवतरल्याचा भास झाला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
शिवजयंती महोत्सव समिती, सातारा यांच्या वतीने आयोजित या महोत्सवाचा प्रारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विधीवत गडपूजन करण्यात आले. त्यानंतर तुतारीच्या ललकारीत आणि शिवगर्जनांच्या जयघोषात सर्व मावळे राजसदरेवर दाखल झाले. शिवेंद्रसिंहराजे यांनी मशाली प्रज्वलित करताच संपूर्ण किल्ल्याची तटबंदी प्रकाशाच्या झोतात न्हाऊन निघाली.
या सोहळ्याला नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर, आरोग्य सभापती जांभळे, पक्षपतोद निशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवभक्तांचा महासागर
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात झालेली फटाक्यांची आतषबाजी सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.
किल्ल्यावर अवतरला शिवकाल
शिवजयंती उत्सव समितीने या महोत्सवासाठी जय्यत तयारी केली होती. किल्ले अजिंक्यताऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि बुरुजांवर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. जागोजागी रेखाटलेल्या रांगोळ्या, डोळे दीपणारी रोषणाई आणि भगवे फेटे परिधान केलेले मावळे यामुळे गडावर पुन्हा एकदा स्वराज्याचा वैभवशाली काळ अनुभवायला मिळाला.