Satara: चित्ररूपातून अवतरला साहित्य संमेलनांचा प्रवास !, शाहू क्रीडा संकुलाचे पालटले रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:40 IST2025-12-30T17:38:52+5:302025-12-30T17:40:38+5:30
99th All India Marathi Literary Conference: थोरल्या शाहूंचा असाही सन्मान..

Satara: चित्ररूपातून अवतरला साहित्य संमेलनांचा प्रवास !, शाहू क्रीडा संकुलाचे पालटले रूप
सचिन काकडे
सातारा : ऐतिहासिक सातारा नगरीत १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत रंगणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साताऱ्यातील कलाकारांची प्रतिभा शाहू क्रीडा संकुलाच्या भिंतींवर अवतरू लागली आहे. संमेलनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या कलात्मक रंगरंगोटीमुळे क्रीडा संकुलाचे रूप पालटले असून, आजवर झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचा वारसा चित्ररूपात साहित्यप्रेमींशी संवाद साधणार आहे.
संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतींवर आजवर पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचा प्रवास अतिशय कल्पकतेने रेखाटण्यात आला आहे. सासवड, अमळनेर, नाशिक, डोंबिवली, वर्धा, दिल्ली येथे झालेली साहित्य संमेलने चित्ररूपातून भिंतींवर रेखाटतानाच त्यांना चरखा, लेखनी, पुस्तक तसेच गडकिल्ल्यांच्या चित्रांची जोडही देण्यात आली आहे. साताऱ्यातील स्थानिक कलाकारांच्या कुंचल्यातून साकारलेली ही चित्रमालिका साहित्याच्या इतिहासाचा जणू जिवंत दस्तऐवजच ठरत आहे. मुख्य मंडपाकडे जाताना हे दृश्य साहित्यप्रेमींना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात असून, हे काम गतीने सुरू आहे.
थोरल्या शाहूंचा असाही सन्मान..
१. सातारा शहराला राजधानीचा मान मिळाला. हे शहर वसविणारे स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज थोरले हे द्रष्ट्ये राज्यकर्ते होते. संमेलनाच्या निमित्ताने शाहू महाराज यांच्यासह मराठी साहित्याला जागतिक उंचीवर नेणाऱ्या नामवंत साहित्यिकांच्या प्रतिमादेखील भिंतींवर देखण्या स्वरूपात साकारण्यात आल्या आहेत.
२. यासोबतच मराठी भाषेचा गोडवा सांगणारे अभंग, सुविचार आणि समृद्ध वाक्ये साहित्यप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. शाहू क्रीडा संकुलाच्या गोलाकार बैठक व्यवस्थेवरही रंगांची उधळण सुरू असून, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने क्रीडा संकुलाचे रूपडे बदलून गेले आहे.
स्थानिक कलाकारांचा सहभाग..
संमेलनासाठी प्रवेशद्वारापासून ते सभा मंचापर्यंत इतिहासाची आणि साहित्याची सांगड घालण्यात आली आहे. सातारकर कलाकारांनी अहोरात्र मेहनत घेऊन साकारलेल्या या कलाकृतींमुळे संमेलनाच्या वैभवात भर पडली आहे. स्थानिक कलाकारांच्या कुंचल्यातून साकार होत असलेल्या या कलाकृती संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरत असून, साहित्य व कलेचा हा संगम साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणार आहे.