नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा : सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:27 IST2021-01-13T18:26:12+5:302021-01-13T18:27:00+5:30
collector Visit Sataranews- हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, कीड रोग व नैसर्गिक आपत्तीशी सामना करताना शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा कष्टकरी व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे.

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा : सिंह
फलटण : हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, कीड रोग व नैसर्गिक आपत्तीशी सामना करताना शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा कष्टकरी व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे.
काळज, ता. फलटण येथील पेरु बागांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी सिंह यांनी फलटण तालुक्यातील गिरवी, निरगुडी येथील द्राक्ष, डाळींब बागा, शेवगा शेती व शेत तळ्यातील मत्स्य शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य रामदास कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग व शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.
निरगुडी येथे भानुदास जगन्नाथ तावरे यांच्या सुमारे १७ एकर क्षेत्रातील द्राक्ष बागेची पाहणी द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन, मिळणारा बाजारभाव याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. त्यानंतर गिरवी फलटण येथे प्रगतशील शेतकरी रामदास कदम यांच्या द्राक्ष बाग, शेवगा शेती, शेत तळ्यातील मत्स्य शेती या प्रकल्पांची पाहणी करून तेथील उत्पादन, बाजार पेठ, नैसर्गिक आपत्तीमधून पिके वाचविण्यासाठीच्या उपाय योजना याबाबत सविस्तर माहिती घेतली. अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
द्राक्ष व इतर फळ पिकांसाठी अच्छादन करताना वापरण्यात येणारे कागद व त्यासाठी उभारावा लागणारा लोखंडी सांगाडा ही खर्चिक बाब असल्याने त्यासाठी शासकीय अनुदान मिळावे, अशी मागणी यावेळी रामदास कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.