साताऱ्यात उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला, महामार्गावरील निकृष्ट काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:19 IST2025-07-19T15:18:58+5:302025-07-19T15:19:26+5:30
धोका टाळण्यासाठी तातडीने दुरुस्तीची गरज

साताऱ्यात उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला, महामार्गावरील निकृष्ट काम
सातारा : येथील अजंठा चौकात पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावरील रस्त्याच्या काही भागांचा स्लॅब कोसळून भगदाड पडले. त्यामुळे पुलाची जाळी उघडी पडली. येथून वाहने भरधाव वेगात असल्याने रात्री अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
परंतु महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलली नाहीत. सुस्त प्रशासन आणि निर्ढावलेल्या ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट कामाचे यानिमित्ताने पितळ उघडे पडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
सातारा शहराजवळून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गाचे २०१८-१९मध्ये सहापदरीकरण होताना अजंठा चौकात उड्डाणपूल उभारण्यात आला. सहापदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत अनेकदा तक्रारी यापूर्वी झालेल्या आहेत. सेवा रस्त्याचे निकृष्ट काम, महामार्गावर अनेक ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे टायर फुटले. मात्र, रस्त्याच्या देखभालीकडे ठेकेदारांकडून कायम दुर्लक्ष करण्यात आले. हे दुर्लक्षच प्रवाशांच्या मुळावर उठत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजंठा येथील उड्डाणपुलाच्या स्लॅबमधून खडी निसटून पडू लागली होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी अचानक पुलावरील रस्त्याच्या काही भागांचा स्लॅब कोसळला. त्यामुळे लोखंडी जाळी उघडी पडल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. सध्या त्या ठिकाणी तात्पुरते रिफ्लेक्टर बसविले आहेत.
मात्र, कोणताहा सूचना फलक लावण्याची तसदी प्रशासन व ठेकेदाराने घेतली नाही. या ठिकाणी तातडीने दुरुस्तीबाबत हालचाल दिसत नाही. रात्री या ठिकाणी वाहन चालविणे धोकादायक असून, अपघाताची शक्यता आहे. पुलाच्या ढासळलेल्या भागाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासन व ठेकेदार यांनी दुरुस्ती करण्याची गरज आहे.
वाहनांच्या हादऱ्यांमुळे जॉईंट निकामी
पुलाचा कामात वापरण्यात आलेले एक्सान्शन जॉईंट वाहनांच्या हादऱ्यामुळे हळूहळू निकामी झाले. जुने बेरिंग वेळेत बदलून नवीन बेरिंग टाकण्याची गरज आहे. उड्डाणपुलावरून हजारो वाहने जात असल्यामुळे नियमित देखभाल दुरुस्ती न झाल्यास रस्ता खराब होत आहे.