Satara: कास पठारावरील फुलं अन् बैलगाडी सफारीची परदेशी पाहुण्यांना भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:17 IST2025-09-17T17:17:01+5:302025-09-17T17:17:22+5:30
पेट्री : कासच्या फुलोत्सवाला हजारो लोकांची गर्दी होत असताना कास पुष्प पठाराची भुरळ परदेशी नागरिकांना पण पडत आहे. शनिवारी ...

Satara: कास पठारावरील फुलं अन् बैलगाडी सफारीची परदेशी पाहुण्यांना भुरळ
पेट्री : कासच्या फुलोत्सवाला हजारो लोकांची गर्दी होत असताना कास पुष्प पठाराची भुरळ परदेशी नागरिकांना पण पडत आहे. शनिवारी दक्षिण कोरियन नागरिकांनी कासला भेट देत येथील विविधरंगी फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला. दरम्यान, पठारावरील सौंदर्याचे खूप कौतुक केले.
हजारो किलोमीटर दूरवरून आलेल्या दक्षिण कोरिया नागरिकांमध्ये नामवंत कंपनीचे कार्यकारी व्यवस्थापक एस. डब्ल्यू. शीम, ऑपरेशन हेड इंडिया प्लांटचे बी. एच. चोई, जे. एम. कीम, माल गावन जंग, प्रशांत येवले, हेमंत कदम इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वनविभाग, समितीमार्फत त्यांचे स्वागत केले गेले. हेरिटेजवाडीमध्ये ढोल, ताशा, शिंग फुंकून, पुष्पहार घालून परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
गतवर्षी जपानसह इतर देशाच्या पर्यटकांनीही कासला भेट देऊन आनंद व्यक्त केला होता. सद्य:स्थितीत कास पठारावर तेरडा, गेंद, सीतेची आसवे, मंजिरी, सोनकी, टोपली कारवी या फुलांची संमिश्र उधळण पाहावयास मिळत आहे. फुलोत्सव ऐन बहरात आहे. गेली चार पाच दिवस पावसाच्या रिपरिपीनंतर दोन चार दिवसांपासून पाऊस चांगलाच उघडला आहे. वातावरण आल्हाददायक आहे. निळेशार आकाश, अधूनमधून येणारे धुके आणि थंडगार वारा अशा मनमोहक वातावरणात कासवरील फुलांचा स्वर्ग बहरला आहे. विकेंड साधून पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती.
बैलगाडीची सफर करताना भारावून गेले
परदेशी पाहुण्यांना कास पुष्प पठारावरील फुलांच्या सौंदर्याची चांगलीच भुरळ पडली होती. कुमुदिनी मार्गावरील बैलगाडीची सफर करताना पाहुणे भारावून गेले. बैलगाडी सफर निसर्ग आणि फुलांच्या सौंदर्यासह कॅमेऱ्यात कैद करत सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरत नव्हता.
कास पठारावर खूप सुंदर फुले उमलली आहेत. येथील फुलांची निगा चांगल्याप्रकारे राखण्यात आली आहे. पठारावरील व्यवस्थापन पाहता वनविभाग व समितीचे खूप कौतुक वाटते. - एस. डब्ल्यू. शीम, दक्षिण कोरिया, परदेशी पाहुणे