माढ्यात दुष्काळ असताना नेत्यांच्या विमानवाऱ्या; शरद पवार यांचा रणजितसिंह निंबाळकर यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:55 PM2024-04-15T21:55:19+5:302024-04-15T21:55:37+5:30

शशिकांत शिंदे यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना खासदार पवार म्हणाले, विरोधकांकडे सांगण्यासाठी काहीच नाही. शशिकांत शिंदे यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, परंतु आमचं नाणं खणखणीत आहे. त्याची आम्हाला चिंता नाही.

Flight of leaders during drought in Madha; Sharad Pawar's challenge to Ranjit Singh Nimbalkar | माढ्यात दुष्काळ असताना नेत्यांच्या विमानवाऱ्या; शरद पवार यांचा रणजितसिंह निंबाळकर यांना टोला

माढ्यात दुष्काळ असताना नेत्यांच्या विमानवाऱ्या; शरद पवार यांचा रणजितसिंह निंबाळकर यांना टोला

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माढ्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे; परंतु माढ्यातील नेत्यांच्या मात्र विमानवाऱ्या सुरू आहेत, अशी खोचक टीका खासदार शरद पवार यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, यशवंतराव मोहिते अशा कर्तृत्ववान नेत्यांच्या विचारांचा पगडा आजही जिल्ह्यातील सर्वसामान्यांवर आहे. आज देशात जे घडत आहे, त्याला पर्याय देण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने पुरोगामी सातारा जिल्ह्यातून पहिले पाऊल टाकले आहे. आज हजारोंच्या संख्येने आलेल्या सातारकरांनी आमचा आत्मविश्वास वाढवला आहे, असे पवार म्हणाले.

शशिकांत शिंदे यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना खासदार पवार म्हणाले, विरोधकांकडे सांगण्यासाठी काहीच नाही. शशिकांत शिंदे यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, परंतु आमचं नाणं खणखणीत आहे. त्याची आम्हाला चिंता नाही.
सातारा हा बालेकिल्ला राहिला आहे का? असा प्रश्न केला असता पवार म्हणाले, याचे उत्तर गतवेळच्या पोटनिवडणुकीत सातारकरांनी दिले आहे. याहीवेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष जिवाभावाने या निवडणुकीत उतरले आहेत. देशातील एकेक जागा लढवण्यासाठी सर्वांनी मोट बांधली आहे.

रघुनाथराजेंची भावना स्वच्छ
रामराजे, संजीवराजे स्वगृही परततील का? असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, फलटणचे रामराजे अथवा त्यांचे बंधू संपर्कात नाहीत. रघुनाथराजे यांनी अकलूजला मोहिते-पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते. त्यांची तशी इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेंबद्दल प्रजेने काय बोलावे
उदयनराजे भोसले यांना उमेदवारीबाबत ताटकळत ठेवल्याविषयी छेडले असता पवार म्हणाले, राजेंबद्दल आम्हा प्रजेने काय सांगायचे. जी परिस्थिती आहे, ती तुम्हा सर्वांना दिसते.

Web Title: Flight of leaders during drought in Madha; Sharad Pawar's challenge to Ranjit Singh Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.