‘पाच रुपयांची पैठणी’ विक्रेत्याच्या अंगलट !

By Admin | Updated: July 25, 2016 23:36 IST2016-07-25T22:41:50+5:302016-07-25T23:36:04+5:30

कऱ्हाडात ‘सेल’चे फलक फाडून टाकले : खोट्या जाहिरातबाजीमुळे संतप्त महिला ग्राहक आक्रमक

'Five rupees paithani' seller's face! | ‘पाच रुपयांची पैठणी’ विक्रेत्याच्या अंगलट !

‘पाच रुपयांची पैठणी’ विक्रेत्याच्या अंगलट !

कऱ्हाड : पाच रुपयांमध्ये पैठणी आणि तीन रुपयांंमध्ये कोणतीही साडी देण्याची जाहिरातबाजी करणाऱ्या कऱ्हाडातील सेलला सोमवारी शेकडो ग्राहकांनी भेट दिली. मात्र, पाच हजारांच्या खरेदीनंतर पाच रुपयांना पैठणी देणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर संतापलेल्या ग्राहकांनी तेथील कामगारांसह मालकालाही फैलावर घेतले. अखेर मालकानेच परिसरात लावलेले सेलचे सर्व फलक फाडून सेल बंद केल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर आक्रमक जमाव तेथून निघून गेला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर नाक्यानजीक मिनार्ती मंगल कार्यालय आहे. या कार्यालयात सोमवारपासून ‘सैराट’ नावाचा कपड्यांचा सेल सुरू करण्यात आला होता. या सेलच्या जाहिराती प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लावण्यात आल्या होत्या. त्यावर पाच रुपयांत पैठणी, तीन रुपयांत कोणतीही साडी, दोन रुपयांत सैराट साडी अशी आॅफर दिली होती. सोमवारी सकाळीच पोस्टर वाहनांवर चिटकविण्यात आले. संबंधित वाहने ज्या-ज्या गावात गेली तेथील महिलांना या सेलची माहिती झाली. पाच रुपयांत पैठणी आणि तीन रुपयांत कोणतीही साडी मिळणार असल्याने कऱ्हाड तालुक्यासह पाटण व ढेबेवाडी खोऱ्यांतील महिलाही खरेदीसाठी कऱ्हाडला आल्या.
मंगल कार्यालयात जाऊन त्यांनी पैठणी तसेच साड्यांची पाहणी केली. काहींनी साडी खरेदीही केली. मात्र, पाच हजारांच्या खरेदीनंतर पहिल्या २५ जणांना ही आॅफर दिल्याचे तेथील कामगारांनी महिलांना सांगितले. यावेळी शाब्दिक वाद झाला. आक्रमक झालेल्या महिला तेथून बाहेर आल्या. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आणखी जमाव त्याठिकाणी जमला. त्यांनी सेलच्या मालकाला बाहेर बोलावून घेतले. जाहिरातीप्रमाणे पाच रुपयांत पैठणी द्या, अशी मागणी जमावाने केली. मात्र, त्याला असमर्थता दर्शवित मालकानेच परिसरात लावलेले सेलचे सर्व फलक फाडून टाकले. सेल बंद केल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानंतर आक्रमक जमाव तेथून निघून गेला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Five rupees paithani' seller's face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.