शेखर गोरेंसह पाचजणांवर अपहरणाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 20:48 IST2021-03-01T20:45:20+5:302021-03-01T20:48:31+5:30
Crime News Satarapolice- पानवण, ता. माण येथील डॉक्टर नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना, याच गावातील सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांचेही अपहरण झाल्याचे समोर आले आहे. धनाजी शिंदे यांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शेखर गोरेंसह पाचजणांवर अपहरणाचा गुन्हा
म्हसवड : पानवण, ता. माण येथील डॉक्टर नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना, याच गावातील सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांचेही अपहरण झाल्याचे समोर आले आहे. धनाजी शिंदे यांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेखर गोरे, राजेंद्र ऊर्फ राजू जाधव, संग्राम अनिलकुमार शेटे, राहुल अर्जुन गोरे, वीरकुमार पोपटलाल गांधी, चालक हरिदास गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जिल्हा बँकेच्या ठरावावरून डॉ. नानासाहेब शिंदे यांचे शनिवारी रात्री साडेआठ वाजता अज्ञाताने अपहरण केले होते. यावेळी अपहरणकर्त्यांनी त्यांची कार अॅसिडने जाळण्याचाही प्रयत्न केला होता.
या प्रकारानंतर डॉक्टरांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली. त्यानंतर डॉक्टर स्वत:हून रविवारी सायंकाळी अचानक घरी परतले. त्यामुळे त्यांचे नेमके कोणी अपहरण केले, याची चौकशी सध्या पोलीस त्यांच्याकडे करत आहेत.
हे प्रकरण सुरू असतानाच पानवच्या सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांनीही आपले अपहरण झाल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
धनाजी शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेखर गोरेंसह पाचजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. धनाजी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वरील संशयितांनी कारमध्ये जबरदस्तीने बसवून कुळजाईमधील फार्म हाऊसवर तसेच ठाण्यातील लॉजवर थांबवून ठेवले.
दरम्यान, डॉ. नानासाहेब शिंदे आणि धनाजी शिंदे यांच्या अपहरणाच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून, पोलीस संबंधितांकडे कसून चौकशी करत आहेत. सायंकाळपर्यंत यातील वस्तुस्थिती समोर येणार आहे.