महिला डॉक्टरची सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक,कऱ्हाडात दोघांवर गुन्हा

By दीपक शिंदे | Updated: December 20, 2024 22:25 IST2024-12-20T22:24:50+5:302024-12-20T22:25:36+5:30

Satara News: कस्टम (सीमाशुल्क) विभाग आणि दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होण्याची भीती घालून दोघांनी कऱ्हाडातील महिला डॉक्टरची तब्बल सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली.

Female doctor cheated of Rs 16 lakh online, two charged in Karad | महिला डॉक्टरची सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक,कऱ्हाडात दोघांवर गुन्हा

महिला डॉक्टरची सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक,कऱ्हाडात दोघांवर गुन्हा

कऱ्हाड - कस्टम (सीमाशुल्क) विभाग आणि दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होण्याची भीती घालून दोघांनी कऱ्हाडातील महिला डॉक्टरची तब्बल सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली. दिल्ली विमानतळावर पकडलेल्या साहित्यात तुमच्या नावाचे सोळा पासपोर्ट आणि ड्रग्ज सापडल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आली.

याबाबत डॉ. प्रणोती रुपेश जडगे यांनी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडात राहणाऱ्या प्रणोती जडगे या कृष्णा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. २० सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला. संबंधिताने आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूममधून सीमाशुल्क अधिकारी सुमित मिश्रा बोलत असल्याचे सांगून, तुमच्या नावाचे दिल्ली ते मलेशियासाठीचे पार्सल विमानतळावर अडवून ठेवले आहे. त्यामध्ये १६ पासपोर्ट, ५८ एटीएम कार्ड आणि १४० ग्रॅम ड्रग्ज असून, हा गुन्हा ज्या पोलिस ठाण्याला नोंदवला, त्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोला, असे त्या मिश्रा नामक व्यक्तीने सांगितले. तसेच त्याने वसंतकुंज पोलिस ठाण्यातील सुनील कुमार या व्यक्तीशी फोन जोडून दिला. सुनील कुमार याने डॉ. प्रणोती जडगे यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घालून न्यायालयाने तुमची सर्व बँक खाती गोठविण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगितले. तसेच दिल्ली न्यायालयाच्या नावे असलेल्या आदेशाची एक प्रत डॉ. प्रणोती जडगे यांच्या व्हॉट्सॲपला पाठवून दिली.

या सर्व प्रकारांमुळे डॉ. जडगे घाबरल्या. त्यानंतर सुनील कुमार नामक व्यक्तीने त्यांना व्हिडीओ कॉल करून तुम्हाला यातून निर्दोष बाहेर पडायचे असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम रिझर्व बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करा, असे सांगितले. डॉ. जडगे यांनी त्यांच्या बँक खात्यातील १६ लाख २५ हजार १०० रुपये संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाइन हस्तांतरित केले. मात्र, त्यानंतर सुनील कुमार व सुमित मिश्रा या दोघांचेही फोन लागले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉ. प्रणोती जडगे यांनी शुक्रवारी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. सहायक फौजदार सुभाष फडतरे तपास करीत आहेत. 

‘त्या’ मेसेजनंतर संशयितांचे फोन बंद
डॉ. प्रणोती जडगे यांनी रक्कम पाठविल्यानंतर प्रत्येक तासाला तुम्ही आम्हाला ‘आयएमसेफ सर’ असा मेसेज करा, असे संशयितांनी सांगितले होते. त्यामुळे डॉ. प्रणोती जडगे यांनी संबंधितांना तसे मेसेज केले. मात्र, दुसऱ्या दिवशी सायंकाळी अचानक ‘सॉरी मॅडम, तुमचे पैसे गोठवले गेले आहेत आणि आम्ही काहीही करू शकत नाही,’ असा मेसेज संशयितांकडून डॉ. जडगे यांना प्राप्त झाला. त्यानंतर संशयितांचे फोन बंद झाल्याचे डॉ. जडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Female doctor cheated of Rs 16 lakh online, two charged in Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.