उदयनराजेंच्या धक्कातंत्राची साताऱ्यातील मातब्बरांना धास्ती; उपनगराध्यक्ष निवडीनंतर आता सभापती पदाकडे नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:34 IST2026-01-28T19:33:57+5:302026-01-28T19:34:17+5:30
अपक्षांना संधी मिळणार?

संग्रहित छाया
सातारा : सातारा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवडीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी अनपेक्षित खेळी खेळत जे धक्कातंत्र अवलंबले, त्याचे पडसाद अद्याप शांत झालेले नाहीत; तोच विषय समित्यांच्या सभापती निवडीचा धुरळा उडू लागला आहे. या मानाच्या खुर्च्यांवर विराजमान होण्यासाठी इच्छुकांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली असून, साताऱ्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा लॉबिंगला उधाण आले आहे.
नगरपालिकेत खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही नेत्यांचा शब्द अंतिम असतो. मात्र, सध्या ४१ नगरसेवकांपैकी बहुतांश चेहरे नवे असल्याने ‘नव्यांना संधी की जुन्यांना प्राधान्य’ असा पेच नेत्यांसमोर आहे. गटनेतेपदी अविनाश कदम आणि प्रतोदपदी निशांत पाटील यांची वर्णी लावून नेत्यांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला, तरी सभापतिपदाच्या सहा जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. सभापतिपदातही समसमान फॉर्म्युला ठरण्याची शक्यता असली तरी, ऐनवेळी कोणाची लॉटरी लागणार यावरून कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
अपक्षांना संधी मिळणार?
उपनगराध्यक्ष निवडीत ज्याप्रमाणे धक्कातंत्र पाहायला मिळाले, तसेच सभापती निवडीतही घडणार की नवीन चेहऱ्याला संधी देऊन प्रस्थापितांना धक्का दिला जाणार? या प्रश्नांनी सध्या इच्छुकांच्या छातीत धडधड वाढवली आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, नियोजन, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि मागासवर्गीय कल्याण या समित्यांच्या निवडीची प्रक्रिया या आठवड्यात पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
..तरच शहर विकासाच्या गाडीला गती
गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत शहराचा कारभार सुरू होतो. आता लोकनियुक्त कार्यकारिणी अस्तित्वात आली असली तरी शहर विकासासाठी ‘स्थायी समिती’ सक्रिय असणे अनिवार्य आहे. सभापती निवडीनंतर पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींच्या हातात येतील. त्यामुळे सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.