Satara: बुडणाऱ्या मुलांना वाचविताना पित्याचा मृत्यू, कऱ्हाडातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:35 IST2025-04-25T13:34:43+5:302025-04-25T13:35:27+5:30
दोन युवकांनी मुलांना वाचविले

Satara: बुडणाऱ्या मुलांना वाचविताना पित्याचा मृत्यू, कऱ्हाडातील घटना
कऱ्हाड : कोयना नदीपात्रात बुडणाऱ्या मुलगी आणि मुलाला वाचविताना अभिनंदन रतन झेंडे (वय ३४, रा. शाहू चौक, कऱ्हाड) याचा बुडून मृत्यू झाला. शहरातील जुन्या ब्रिटिशकालीन पुलानजीक गुरुवारी सकाळी ही घटना घडली. मृत अभिनंदन झेंडे याच्यावर कऱ्हाड शहर, तसेच ग्रामीण पोलिस ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू चौकात राहणारा अभिनंदन झेंडे हा गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याची मुलगी व मुलाला घेऊन जुन्या ब्रिटिशकालीन पुलानजीक कोयना नदीपात्रात पोहायला गेला होता. तेथे तिघेही नदीपात्रात उतरले. मात्र, अचानक मुलगी व मुलगा गटांगळ्या खात असल्याचे अभिनंदनच्या निदर्शनास आले. त्याने त्या दोघांकडे धाव घेतली. तेंव्हा मुलीने अभिनंदनला मिठी मारली. तो मुलीला व मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नदीकाठावर थांबलेल्या अमर गायकवाड व रोहन चौगुले या युवकांच्या निदर्शनास आले.
त्यांनीही तातडीने नदीपात्रात उड्या घेतल्या. अमर गायकवाड याने मुलीला पाण्यातून ढकलत बाहेर काढले, तर रोहन चौगुले हा मुलाला घेऊन नदीपात्रातून बाहेर आला. मात्र, अभिनंदन झेंडे नदीपात्रातून बाहेर आला नाही. त्यामुळे अमर व रोहन यांनी नदीपात्राकडे पाहिले असता अभिनंदन त्यांना दिसला नाही. तो बुडाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली.
घटना समजताच कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी नदीपात्रात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे
अभिनंदन झेंडे याच्यावर कऱ्हाड शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, दहशत माजविण्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई झाली होती. तडीपारीची मुदत संपल्यानंतर तो शाहू चौकात वास्तव्यास आला होता, तसेच गत काही वर्षांपासून तो गुन्हेगारीपासून अलिप्त होता. त्याच्या वर्तणुकीतही सुधारणा झाली होती, असे पोलिसांनी सांगितले.
अभिनंदन पट्टीचा पोहणारा, मग बुडाला कसा?
नदीपात्रात बुडून मृत्यू झालेला अभिनंदन झेंडे हा पट्टीचा पोहणारा होता. मुले बुडत असताना त्याने दोन्ही मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. इतर दोन युवकांनी त्याला मदतही केली. त्यामुळे मुले वाचली. मात्र, पट्टीचा पोहणारा अभिनंदन पाण्यात कसा बुडाला, असा प्रश्न नातेवाईक उपस्थित करीत आहेत. पोहताना त्याला दम लागला की अन्य काही कारणाने त्याचा मृत्यू झाला, हे शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होणार आहे.