गोरेंच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा सहभाग!
By Admin | Updated: January 18, 2016 00:41 IST2016-01-17T23:14:58+5:302016-01-18T00:41:19+5:30
जिल्हा बँक : आजपासून साताऱ्यात उपोषण

गोरेंच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा सहभाग!
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालकांच्या अधिकारांवरून वादळ उठविणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांनी सोमवार, दि. १८ जानेवारीपासून बँकेचे मुख्य कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. आता या आंदोलनात शेतकऱ्यांना सामावून घेऊन या लढ्याला व्यापक स्वरूप देण्याची खेळीही त्यांनी खेळली आहे. नाबार्डचे पुरस्कार प्राप्त केलेली आणि राज्याच्या सहकार खात्याने अनेकदा गौरविलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हुकूमशाही पद्धतीने सुरू असल्याचा आरोप आ. गोरे यांनी केला आहे. आमदार जयकुमार गोरे हे स्वत: बँकेचे संचालक आहेत. मात्र, ‘बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, तसेच या बँकेचा कारभार दाखविला जातो, त्या पद्धतीने चांगला चालला नाही,’ असा आ. गोरेंचा आरोप आहे. विषय परस्पर पद्धतीने मंजूर केले जात असल्याने राज्यातील २५ जिल्हा मध्यवर्ती बँका बुडीत निघाल्या, त्याच पद्धतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकही निघेल, अशी भीती आ. गोरे व्यक्त करत आहेत. या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी वर्गालाही केले आहे. आता या उपोषणात आ. गोरेंच्या पाठीशी किती शेतकरी उभे राहतात, हे औत्सुक्याचे ठरले आहे. दरम्यान, सहकारी संस्थेमधील गैरव्यवहाराचा आरोप करत आमदारने उपोषण करण्याची साताऱ्याच्या इतिहासातील बहुधा ही पहिलीच वेळ असल्याने या उपोषणाकडे जिल्ह्याच्या जनतेचे लक्ष लागून राहिले
आहे. (प्रतिनिधी)