Satara: आदर्की खुर्द येथे कुऱ्हाडीचा घाव घालून शेतकऱ्याचा खून; बांधावरून बोअरवेलची गाडी नेल्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 12:34 PM2024-04-04T12:34:45+5:302024-04-04T12:35:03+5:30

एका तासात आरोपीला अटक

Farmer killed by ax wound at Adarki Satara; Borewell car was attacked by a farm embankment | Satara: आदर्की खुर्द येथे कुऱ्हाडीचा घाव घालून शेतकऱ्याचा खून; बांधावरून बोअरवेलची गाडी नेल्याने हल्ला

Satara: आदर्की खुर्द येथे कुऱ्हाडीचा घाव घालून शेतकऱ्याचा खून; बांधावरून बोअरवेलची गाडी नेल्याने हल्ला

आदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द येथे बोअरवेल मशीन व पिकअप वाहन बांधावरून नेल्याने बांध खराब झाला. या कारणावरून चंद्रशेखर बबनराव निंबाळकर (वय ४८, रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) या शेतकऱ्याचा एकाने डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या प्रकारानंतर लोणंद पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

सयाजी शंकर निंबाळकर (वय ५१, रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आदर्की खुर्द (ता. फलटण) गावच्या हद्दीत चिंचेचा मळा नावचे शिवार आहे. या शिवारात चंद्रशेखर निंबाळकर यांनी सयाजी निंबाळकर याच्या शेताच्या बांधावरून चार दिवसांपूर्वी बोअरवेलची मशीन व पिकअप वाहन नेले होते. त्यामुळे बांध खराब केल्याचा राग सयाजी निंबाळकर याच्या मनात होता.

मंगळवार दि. २ रोजी सायंकाळी दोघेही चिंचेचा मळा नावाच्या शिवारात गेले होते. त्यावेळी सयाजी निंबाळकर याने चंद्रशेखर निंबाळकर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकाराची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांना उपचारासाठी फलटण येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

खुनाची घटना पोलिसांना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यादरम्यान संशयित सयाजी निंबाळकर याला पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक केली. न्यायालयाने त्याला दि. ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत.

दिवसा वाढदिवसाचे, तर सायंकाळी श्रद्धांजलीचे मेसेज..

चंद्रशेखर निंबाळकर यांचा वाढदिवस दि. २ रोजी असल्याने गावच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेकजण त्यांना देत होते. तर सायंकाळी चंद्रशेखर यांचा मृत्यू झाल्याचे समजताच गाव सुन्न झाले. व्हॉट्सॲप ग्रुपवर अखेर श्रद्धांजलीचे मेसेज फिरू लागले.

Web Title: Farmer killed by ax wound at Adarki Satara; Borewell car was attacked by a farm embankment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.