Satara: गोव्यातील ८४ लाखांची बनावट विदेशी दारू जप्त, दोघांना अटक; गुजरातला पोहोचवायची होती दारू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:26 IST2025-04-30T14:26:16+5:302025-04-30T14:26:45+5:30
सातारा : गोव्याहून तब्बल ८४ लाख ४१ हजारांची बनावट विदेशी दारूची तस्करी ट्रकमधून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व ...

Satara: गोव्यातील ८४ लाखांची बनावट विदेशी दारू जप्त, दोघांना अटक; गुजरातला पोहोचवायची होती दारू
सातारा : गोव्याहून तब्बल ८४ लाख ४१ हजारांची बनावट विदेशी दारूची तस्करी ट्रकमधून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व उत्पादन शुल्कच्या पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत करण्यात आली.
ट्रकचालक सचिन विजय जाधव (वय ३५, रा. खानापूर, सांगली), मालक जमीर हरुण पटेल (४५, रा. आगाशिवनगर, मलकापूर, कऱ्हाड), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक सचिन जाधव हा दारूचा माल घेऊन गोव्यावरून गुजरातला जात आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने उत्पादन शुल्कचे निरीक्षक माधव चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक धोंडिराम वाळवेकर, रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाला याची माहिती दिली.
या पथकाने बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीतील महामार्गालगत असलेल्या उरमोडी नदीजवळ पहाटे तीन वाजता सापळा लावला. गोव्यावरून ट्रक बोरगावजवळ येताच पथकाने ट्रक अडवला. ट्रकचालक सचिन जाधव हा एकटाच ट्रकमध्ये होता. त्याच्याकडे ट्रकमधील मालाबाबत चाैकशी करून पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये गोव्यावरून आणलेली विविध कंपनीची ८४ लाख ४१ हजार ४० रुपयांची ही बनावट दारू आढळून आली.
सातारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट दारू जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांच्या पथकाने ट्रक चालक सचिन जाधव याच्याकडे चाैकशी केल्यानंतर त्याने हा माल जमीर पटेल याचा असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पटेल याला कऱ्हाडमधून अटक केली. हा दारूचा बनावट माल गुजरातला कोणाकडे देणार होते, याचा पोलिस कसून तपास करीत आहेत.
हवालदार अतीश घाडगे, साबीर मुल्ला, अमोल माने, शरद बेबले, अमित सपकाळ, प्रवीण फडतरे, जयवंत खांडके आदींनी या कारवाईत भाग घेतला.
यामुळे दारू बनावट समजलं..
उत्पादन शुल्कचे निरीक्षक माधव चव्हाण यांनी गोव्यावरून आणलेली ही दारू बनावट असल्याचे सांगितले. संबंधित दारूच्या बाटल्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हती. तसेच बाटलीतील दारूची ४२.८ची स्ट्रेंथ नव्हती. त्यामुळे ही दारू बनावट असल्याचे तपासणीत समोर आले. काही बाॅक्समधील दारूची स्ट्रेंथ ३६ तर काहींची ४० आढळून आली. या दारूची किंमत ८४ लाख तर ट्रकची किंमत १६ लाख ५० हजार आहे, असा एकूण एक कोटी ९१ लाखांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी हस्तगत केला.