तीची कहाणी : जखमी अवस्थेतही विव्हळतच मदत मागण्याचा प्रयत्न केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 12:27 IST2021-06-03T12:21:59+5:302021-06-03T12:27:02+5:30
Railway Accidetn Satara : रेल्वेतून जमिनीवर फेकले गेले. रेल्वे पुढे जात होती अन् मी खाली पडलेल्या अवस्थेत मम्मी... पप्पा ओरडत होते... किर्रर्र अंधार, सुनसान घाट आणि आजूबाजूला कोणीच नाही. या एकटेपणापेक्षाही मला मम्मी-पप्पा कधीच भेटणार नाहीत, याची भीती जास्त होती... वाऱ्याची झुळूक आली की पाय दुखायचा आणि मी विव्हळून मदत मागण्याचा प्रयत्न करायचे... सकाळ उजाडली तेव्हा भीती गेली... लोक जमले तेव्हा घाबरल्यासारखं झालं, पण त्यांनी मला रुग्णालयात नेलं; काळजी घेतली... तुम्ही सांगा ना त्याने मला का फेकून दिलं!

तीची कहाणी : जखमी अवस्थेतही विव्हळतच मदत मागण्याचा प्रयत्न केला
प्रगती जाधव-पाटील
सातारा : रेल्वेतून जमिनीवर फेकले गेले. रेल्वे पुढे जात होती अन् मी खाली पडलेल्या अवस्थेत मम्मी... पप्पा ओरडत होते... किर्रर्र अंधार, सुनसान घाट आणि आजूबाजूला कोणीच नाही. या एकटेपणापेक्षाही मला मम्मी-पप्पा कधीच भेटणार नाहीत, याची भीती जास्त होती... वाऱ्याची झुळूक आली की पाय दुखायचा आणि मी विव्हळून मदत मागण्याचा प्रयत्न करायचे... सकाळ उजाडली तेव्हा भीती गेली... लोक जमले तेव्हा घाबरल्यासारखं झालं, पण त्यांनी मला रुग्णालयात नेलं; काळजी घेतली... तुम्ही सांगा ना त्याने मला का फेकून दिलं!
अतिप्रसंग करताना ओरडल्यामुळे निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून अंकिता (नाव बदलण्यात आले आहे.) या अवघ्या आठ वर्षांच्या मुलीला धावत्या रेल्वेतून फेकून देण्याचा प्रकार लोणंदजवळ घडला. साताऱ्यात उपचार घेत असलेल्या अंकिताची भेट घेतली.
आदर्की ते वाठार स्टेशनदरम्यान मध्यरात्री दोन वाजता रेल्वेतून फेकून दिल्यानंतर तिने सांगितलेले वर्णन अंगावर शहारे आणणारे आहे. अंकिता म्हणाली, रेल्वेच्या बर्थवर मला पप्पांनी उचललं असंच वाटलं म्हणून मी त्यांना बिलगले. मला उभं केल्यावर डोळे उघडले, तर मी टॉयलेटमध्ये आणि समोर अनोळखी माणूस... त्यांना बघून माझी झोपच उडाली... तो काही तरी करणार इतक्यात मी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारून जोरात ओरडायला सुरुवात केली... माझा आवाज जास्त बाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी माझं तोंड दाबलं, तरीही मी पायांनी दार वाजवायला सुरुवात केली. शेवटी त्याने मला तुम चुप बैठो, मैं छोडता हूँ तुम्हारे मम्मी पापा के पास असं म्हटला, म्हणून मी गप्प झाले.
त्याने मला टॉयलेटमधून उचलून घेतले. त्यांच्याकडे गेल्यानंतर मी सगळी हकीकत सांगायचं ठरवलं... तो दाराकडे निघाला तेव्हा त्याला काही बोलायच्या आतच त्याने दार उघडून मला फेकून दिलं... रेल्वे दूर चालली होती. माझा आवाज कोणालाच येत नव्हता आणि आजूबाजूला कुठं लाईटपण दिसत नसल्याने मी खूप घाबरून गेले. थोड्या वेळासाठी मला झोप लागल्यासारखं झालं; पण वाऱ्याची झुळूक आली की जखम दुखायची आणि मला जाग यायची. जाग आली की मी पुन्हा विव्हळून हाक मारत होते; पण कोणीच मदतीला आले नाही.
सकाळी मला जाग आली तेव्हा अजिबात हलता येत नव्हतं. काही लोक मला मदत करायला आले; पण हे लोकपण त्याच्यासारखे असले तर या भीतीने मला घाबरायला झाले; पण मी त्यांना तसं दिसू दिले नाही. पोलीस आल्यानंतर मला धीर आला. त्यांनी रुग्णालयात नेल्यानंतर मम्मी-पप्पा कुठं आहेत, हे विचारलं, तर त्यांनी ते येताहेत, असं उत्तर दिले आणि माझी भीती कमी झाली. मम्मी-पप्पा भेटल्यावर मी त्यांना विचारले, त्या काकांनी मला खाली का फेकले? त्यांनी उत्तर नाही दिले. तुम्हीच सांगा ना मला का फेकून दिले. आठ वर्षांच्या चिमुकलीच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावे, हे कळतच नाही.
आम्ही गाढ झोपेत असताना हा प्रकार घडला. सकाळी शोधाशोध केल्यानंतर सातारा जिल्ह्यात ती असल्याचे पोलिसांकडून समजल्यावर दिलासा मिळाला. या कठीण प्रसंगात सातारकरांनी आम्हाला प्रचंड मदत केली आहे.
- पीडित मुलीचे वडील